कायदा हातात घेणाऱ्यांची काय अवस्था होते हे आपण पाहतोय, अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जाहीर सभांमधून ते टीका करत आहे. मात्र, त्यांना पवार काय आहेत हे चांगलेच माहीत आहे. आम्ही त्यांचा राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याच प्रयत्न हाणून पाडू.

Ajit Pawar criticized Raj Thackeray

राज ठाकरे यांचे राज्यात जातीय तेढ वाढवण्याचे काम सुरू आहे. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्यांना सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. रवी राणा आणि नवनीत राणा दांपत्याच्या आजच्या स्थितीवरून कायदा हातात घेणाऱ्यांची काय अवस्था होते हे आपण पाहत आहोत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये आयोजीत पक्षाच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की,  राज ठाकरे म्हणजे कॅसेट आहे. ते सुर्य मावळल्यानंतर सायंकाळी सभा घेतात. जाहीर सभांमध्ये त्यांना शाहू, फुले आंबेडकरांचे नाव घ्यायला लाज वाटते. सध्या त्यांचे राज्यात जातीय तेढ वाढवण्याचे काम सुरू आहे. मात्र, सरकार म्हणून जातीय सलोखा राखण्याचे काम आम्ही करत आहोत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जाहीर सभांमधून ते टीका करत आहे. मात्र, त्यांना पवार काय आहेत हे चांगलेच माहीत आहे. आम्ही त्यांचा राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याच प्रयत्न हाणून पाडू. सध्या महागाईचा प्रश्न महत्वाचा आहे. या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी त्यांचे जाणीवपूर्वक शक्तिस्थळांवर हल्ला करून प्रचार आणि प्रसार करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यात खरोखरच दम असता तर नाशिककरांनी त्यांच्या पक्षाचे तीन आमदार पुन्हा निवडून दिले असते. यावेळी वारंवार नाकाला नॅपकिन लावण्यापेक्षा एकदाचे शिंकरून घ्या, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंची नक्कल केली. दरम्यान तुम्ही जनतेला भेडसावणाऱ्या इंधन दरवाढ, महागाई या प्रश्‍नांकडे लक्ष देण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार सर्वश्री दिलीप बनकर, ॲड. माणिकराव कोकाटे, सरोज आहिरे, नितीन पवार, श्रीराम शेटे, माजी आमदार दीपिका चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, रवींद्र पवार, कोंडाजी मामा आव्हाड आदी उपस्थित होते.