घरमुंबईअखेर अजित पवार सहाव्या मजल्यावर

अखेर अजित पवार सहाव्या मजल्यावर

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांना उत्सुकता लागून राहिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच ते देखील सहाव्या मजल्यावरच बसणार असल्याने सर्वांचे लक्ष या दालनावर लागून राहिले होते. अखेर ही उत्सुकता संपली असून सोमवारपासून अजित पवारांनी आपल्या सहाव्या मजल्यावरील दालनात प्रवेश केला आहे. सोमवारच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांनी बैठकांचा धुमधडाका देखील घेतल्याने सहाव्या मजल्याला आता विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ही शपथ घेतल्यानंतर झालेल्या दालन आणि बंगल्यांच्या वाटपाकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. अजित पवार मंत्रालयात नेमके कोणत्या दालनात बसणार याबाबत अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. दालन वाटप सुरु होण्याअगोदरच अजित पवारांनी कामाला देखील सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांनी पहिल्या मजल्यावरुन आपल्या कामकाजाला सुरुवात केली होती. मात्र ते अधिकृतरित्या ते कोणत्या मजल्यावरुन आपले कामकाज करतील, याबाबत अधिकार्‍यांसह सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती.

- Advertisement -

अखेर सामान्य प्रशासन विभागातर्फे अजित पवारांना सहाव्या मजल्यावरील सनदी अधिकारी सिताराम कुंटे यांचे दालन देण्यात आले होते. हे दालन जाहीर झाले असले तरी अजित पवार गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या पहिल्या मजल्यावरील दालनातूनच कामकाज पाहत होते. त्यामुळे मंत्रालयातील सर्व अधिकार्‍यांसह त्यांच्या भेटीला येणार्‍या असंख्य कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांची सहाव्या मजल्यावरुन पहिल्या मजल्यावर दमछाक होत होती. अखेर सोमवारपासून ही दमछाक थांबली असून सहाव्या मजल्यावरील बहुचर्चित दालनात अजित पवारांनी प्रवेश केला आहे.

सोमवारी कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता अजित पवारांनी आपला दालन प्रवेश पूर्ण केला. आर्कषक रोषणाई आणि नव्याने बांधण्यात आलेले हे दालन सोमवारी सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात येत होते. सोमवारी अजित पवार यांच्या स्वागतासाठी या दालनास मोठ्या प्रमाणात फुलांच्या आरास लावून सजविण्यात आले होते. अत्यंत प्रशस्त अशा या दालनात सोमवारी सर्वच अधिकार्‍यांची लगबग सुरु असल्याचे चित्र दिसून आले. तर दुसरीकडे अजित पवारांनी नव्या दालनात प्रवेश करताना आपल्या कामांचा धुमधडाका तसाच कायम ठेवल्याचे चित्र दिसून आले. आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक बैठकांचे आयोजन करीत नव्या दालनातील पहिला दिवस घालविल्याचे चित्र दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -