करोनाची धास्ती; वधू-वरांनी एक दिवस आधीच उरकला विवाह

Akole wedding corona outbreak
अकोले येथील लग्नातील वधू-वराचे छायाचित्र

जगभरात करोनाचा उद्रेक झाल्यानंतर देशातील विविध राज्यात यामुळे बिकट परिस्थिती उद्भवली आहे. दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना ठिकठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने पाऊले टाकली आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या इच्छा-आकांक्षेला मुरड घालत अकोले तालुक्यातील दोन कुटूंबियांनी घरातील विवाह समारंभ मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत एक दिवस अगोदरच साजरा करत प्रशासनाला सकारात्मक प्रतीसाद दिला आहे.

नगर जिल्ह्यातील अकोले येथील आयटीआयचे शिक्षक भरत यशवंत साबळे आणि त्यांच्या पत्नी रंजना यांनी संज्योत या आपल्या मुलीचा विवाह शेरणखेल येथील विवेक कासार याच्याबरोबर काही दिवसांपुर्वी निश्चित केला होता. आज (बुधवारी, १८ मार्च) हा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार होता. यासाठी सग्या-सोयऱ्यांसह आप्तेष्ट, मित्र परिवारालादेखील निमंत्रणे धाडली गेली होती. लग्न म्हणजे हौस-मौज. दोन जीव एका धाग्यात बांधले जाणार असल्याने त्यासाठी नववधू-वर आपल्या जीवनातील सुखद स्वप्नाची वाट बघत होते. नातेवाईकदेखील लग्नसोहळ्यासाठी जमण्याची वेळ झाली. विवाहसोहळा काही तासांवर येऊन ठेपला असताना देशभरातील करोनाची स्थिती लक्षात घेता लग्न समारंभातील गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत आदल्याच दिवशी काही मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत या दोन्ही कुटुंबियांनी मंगळवारी रात्री साडेदहा वाजता साखरपुड्याच्या समारंभातच या नव्या दांम्पत्यांचा शुभमंगल सोहळा उरकून टाकला.

करोनाने जगभरातील स्थिती बिघडवून टाकली असताना आपल्याकडील विवाह सोहळ्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको या भावनेतून एक दिवस अगोदरच शुभमंगल उरकत नवे दांम्पत्य बोहल्यावर चढले. उच्चशिक्षित असलेल्या या दाम्पत्याने आणि नातेवाईकांनी आपल्या इच्छा-आकांक्षाना मुरड घालत एका चांगल्या कामाची सुरुवात आपल्यापासून केली. या साखरपुड्यातील विवाह सोहळ्यासाठी मोजकेच नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता. वधुपिता भारत साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानत आपल्या भावना बोलून दाखविल्या. प्रत्येक माता-पित्याची इच्छा असते की, आपल्या मुला-मुलीचा विवाह थाटामाटात व्हावा. आम्हीदेखील तशी तयारी केली होती. मात्र सध्या उद्भवलेल्या पार्श्वभूमीवर आपणदेखील समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने आपल्या हौसेखातर कोणाला वेठीस धरणे योग्य नसल्याचे सांगत एक दिवस आधीच साखरपुड्यात विवाह सोहळा उरकून घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगीतले.