घरमुंबईआधीच कोरोना, त्यात पाऊस जीवघेणा

आधीच कोरोना, त्यात पाऊस जीवघेणा

Subscribe

मागील दोन वर्षांमध्ये जगभरातील मानव समाजावर आपत्तीचे डोंगर कोसळत आहेत. त्या डोंगरांचे फक्त प्रकार बदलत आहेत. दोन वर्षांपूर्वी कोरोना नावाच्या विषाणूचा चीनमधील वुहान येथून उद्भव झाला. तो विषाणू तिथेच थांबेल असे वाटत होते, पण पुढे त्यांचा संसर्ग वाढत गेला आणि जगातील जवळ जवळ सर्वच देशांमध्ये त्याने प्रवेश करून हाहा:कार उडवून दिला. लाखो लोकांचे बळी गेले. रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. लोकांचे घराबाहेर जाणेच बंद झाले. त्यामुळे उद्योगधंद्यांचे चक्र मंदावले. त्यामुळे लोकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला तर सरकारला महसुलाचा तुटवडा जाणवू लागला.

कोरोनाने अवघ्या जगाची गतीच मंद करून टाकली. कोरोना हा मानवी समाजाच्या जीवनातील एक मोठा स्पीड ब्रेकर ठरला. आजही लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आलेली असली तरी तो पूर्ण उठवण्यात आलेला नाही. कारण जागतिक आरोग्य संघटना आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठवला आणि पुन्हा दुसर्‍या लाटेसारखी भयानक परिस्थिती निर्माण झाली तर काय होईल, अशी सरकारला चिंता वाटत असल्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वे अजूनही सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

कारण २०२० त्या शेवटी कोरोना जाईल, असे वाटू लागल्यामुळे रेल्वे दुपारच्या वेळी सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली होती. पण दुसरी लाट आली आणि मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरू झाला. तो इतका पराकोटीला पोहोचला की, महाराष्ट्र अक्षरश: ऑक्सिजनवर गेला. कारण कोरोनाची लागण झालेल्यांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज लागत होती, पण तितका ऑक्सिजन राज्यामध्ये उपलब्ध नव्हता. काही लोकांचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केंद्र सरकारकडे ऑक्सिजनसाठी विनंती करावी लागली. विविध राज्यांमधून ऑक्सिजन टँकरमधून मागवण्यात आला. लसीकरणाला गती देण्यात आली. कडक लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे आता कुठे कोरोना नियंत्रणात येऊ लागला आहे.

लसींचे पूर्ण नियंत्रण आणि पुरवठा केंद्र सरकारने आपल्या हाती घेतला असला तरी महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसींचा प्रचंड तुटवडा आहे. सर्वसामान्य माणसांची लसीविना तळमळ सुरू आहे. कोविन अ‍ॅपवर मोठ्या मुश्किलीने लसींची नोंदणी होते. मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी बंद असल्यामुळे अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, आता जगायचं कसं असा प्रश्न पडला आहे. गावाला जावे तर गावालाही कोरोना ठाण मांडून बसला आहे, त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी सामान्य माणसांची अवस्था झालेली आहे. बर्‍याचशा गावांचे व्यवहार हे मुंबईहून जाणार्‍या मनीऑर्डरवर चाललेले असतात. त्याचप्रमाणे गावाहून अनेक चीजवस्तू मुंबईच्या बाजारपेठेत विकण्यासाठी येत असतात.

- Advertisement -

राज्य सरकारला कोरोनाची दुसरी लाट आणि त्यामुळे झालेली भयानक अवस्था आठवत आहे. परिणामी सामान्य लोकांसाठी लोकलचे दरवाजे बंदच आहेत. आता पुन्हा गणपतीला बरेचसे लोक मुंबईतून काही दिवसांसाठी आपापल्या गावाला जातील. गावाकडे कोरोनाचा प्रभाव आहे, त्यामुळे हे गावाकडे गेलेले लोक पुन्हा मुंबईला येतील, तेव्हा त्यांच्यासोबत तिथला कोरोना घेऊन येतील का, अशी भीती राज्य सरकारला वाटते. त्यामुळे सरकार संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याच्या मनस्थितीत नाही. कोरोनाने सरकारपासून ते सर्वसामान्य माणसांपर्यंत सगळ्यांचीच कोंडी करून टाकली आहे. एका बाजूला कोरोनाचा कहर सुरू असताना पावसाळा सुरू झाला. मागील वर्षी तर असे वाटत होते की, कोरोना उन्हात भाजून मरून जाईल, कारण तो थंड प्रदेशात टिकतो. पण तसे काही झाले नाही. पुढे लोकांना वाटले की, कोरोना पावसात वाहून जाईल, कारण पावसात मास्क घालणे किती शक्य होणार आहे, पण कोरोना पावसातही काही वाहून गेला नाही. तो पाय रोवून उभाच आहे.

उलट, नवनवी रुपे घेऊन तो पुढे येत आहे. त्याची ती रुपे ओळखून त्यांना आवर घालताना माणसाच्या नाकीनऊ येत आहेत. यावर्षी थंडी, उन्हाळा झाला आणि पावसाळा आला. पण त्या पावसाने कोरोना वाहून जाणे बाजूलाच राहिले, त्याने असा काही भयंकर सपाटा लावला आहे की, त्यात माणसेच वाहून जात आहेत. त्याचबरोबर नदीवरचे पुल, लोकांची घरे कोसळून वाहून जात आहेत. डोंगर आणि दरडी कोसळून जीवित आणि मालमत्तेची हानी ही केवळ ग्रामीण भागात झालेली नाही, तर त्यातून शहरी भाग सुटलेला नाही. मुंबईत बर्‍याच ठिकाणी दरडी कोसळल्या आणि त्यात काहीजणांचे जीव गेले. पाऊस म्हणजे आनंदघन असाच आजवरचा लोकांचा अनुभव होता. चातकाप्रमाणे लोक त्यांची वाट पहात असायचे, पण आता पाऊस म्हटले की, लोकांच्या पोटात गोळा येतो. काळजात चर्र होते.

भयस्वप्ने पडू लागतात. रात्री झोप लागत नाही. पावसामुळे गेल्या काही दिवसात उभ्या महाराष्ट्राचे जे काही अतोनात नुकसान झाले आहे, ते पाहता लोकहो जागे रहा, रात्र पावसाची आहे, असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. एप्रिल, मे महिन्यांमध्ये उन्हामुळे अंगाची काहिली होऊ लागल्यानंतर लोकांना पावसाचे वेध लागतात. पावशा पक्ष्याचा आवाज हवाहवासा वाटतो. त्या आवाजाने एक नवी आशा निर्माण होते. गेल्या तीन चार वर्षांमध्ये कोकणासह सगळ्या महाराष्ट्रामध्ये अचानक आणि अगदी अल्पवधीत मोठ्या प्रमाणात जो पाऊस कोसळतो, ते पाहिल्यावर पुढे काय होणार आहे, याचा नक्की अंदाज बांधता येत नाही, अशी सध्याची अवस्था आहे.

हवामान खाते आपल्याकडे असलेल्या आधुनिक साधनांचा उपयोग करून पावसाचा अंदाज वर्तवित असते. पण ढगफुटी हा जो काही प्रकार आहे, त्याच्या पुढे कुणाचेच काही चालत नाही. कारण हा पाऊस अकल्पितपणे आणि प्रचंड प्रमाणात कोसळतो, त्यामुळे माणसांना जीव वाचवण्यासाठी फारशी हालचालही करता येत नाही. त्यात जीव गमवावा तर लागतोच, त्याचसोबत घरादारांसोबत गुराढोरांचे, पाळीव प्राणी पक्ष्यांचे, पिकांचे, झाडांचे अतोनात नुकसान होते. २६ जुलै २००५ रोजी मुंबईत ढगफुटी झाली. अगदी काही तासात प्रचंड पाऊस पडला आणि त्यात मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले. जीवित आणि मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. गेल्या चार दिवसात पडणार्‍या पावसामुळे पुन्हा तीच आठवण करून दिली आहे. कोकणासह सांगली, सातारा, कोल्हापूर, तसेच विदर्भातसुद्धा पाऊस सपाटून पडत आहे.

पाऊस पडतो ही आनंदाचे गोष्ट आहे, पण तो इतका अचानक आणि भयानक प्रकारे पडतो की, सारे काही धुऊन नेतो. मागे काही ठेवत नाही. त्यामुळे कसं जगायचं हा प्रश्न पडतो, अशा वेळी सरकारकडे संकटग्रस्तांचे डोळे लागलेले असतात. आकाशातला पाऊस थांबतो आणि पुढील चिंतेने तो डोळ्यातून वाहू लागतो. गेल्या दोन वर्षात पृथ्वीवरून कोरोना, आकाशातून वरूणा आणि या दोघांमध्ये माणसाचे सॅण्डविच झाल्यामुळे मरोना, अशी अवस्था झालेली आहे. पण नशीब, निसर्ग आणि नियती हे त्यांच्या नियमांप्रमाणे चालत असतात, त्यांना मानवी सुखदु:खांशी काहीही देणेघेणे नसते. त्यामुळे आपले नातेवाईक आणि घरदार गमावलेल्यांनी स्वत:ला स्वत:च सावरायला हवे. आपल्यातील आत्मबळ जागवायला हवे. जगण्याची जिद्द गमावून चालणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -