घरमुंबईअमिषा पटेलच्या कार्यक्रमासाठी पैसे घेणाऱ्याला खंडणीची धमकी!

अमिषा पटेलच्या कार्यक्रमासाठी पैसे घेणाऱ्याला खंडणीची धमकी!

Subscribe

सिने अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या कार्यक्रमासाठी मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या एका टीव्ही अभिनेत्याला खंडणी मागितल्याप्रकरणी आंबोली पोलिसांच्या एका पथकाने ४ जणांना अटक केली आहे.

अंधेरीतील एका मालिका अभिनेत्याकडे दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणार्‍या चौघांना शुक्रवारी आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. संजय भिमराव वोर्पे, निवृत्ती तुकाराम यादव, संतोष केशवराव शिउरकर आणि ईश्वर प्रकाश शिंदे अशी या चौघांची नावे आहेत. ते चारही आरोपी मूळचे लातूरच्या अहमदनगरचे रहिवाशी असून यातील संजय वोर्पे हा अखिल भारतीय सेनेचा पदाधिकारी असल्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले. या आरोपींकडून पोलिसांनी पोलीस पाटी असलेली एक टाटा सफारी कार जप्त केली आहे. अटकेनंतर चारही आरोपींना अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अभिनेत्री अमिषा पटेलसाठी घेतले होते पैसे!

या प्रकरणातील तक्रारदार मालिका अभिनेता असून तो अंधेरीतील चारबंगला परिसरात राहतो. त्याने काही मालिकांमध्ये काम केले आहे. या कामासह तो एखाद्या कार्यक्रमाला जर कोणाला सेलिब्रिटीची आवश्यकता असल्यास ती सेलिब्रिटी योग्य त्या मोबदल्यात मिळवून देण्याचेही मध्यस्थाचे काम करतो. गेल्या महिन्यात त्याला अजय शर्मा नावाच्या एका व्यक्तीने फोन केला होता. त्याने उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे मॉडर्न पब्लिक स्कूलमध्ये चिल्ड्रन डे निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेत्री अमिषा पटेलने उपस्थित राहावे यासाठी विनंती केली होती. यावेळी तक्रारदाराने अमिषा पटेल कार्यक्रमाला उपस्थित राहील असे सांगून तिचे ५ लाख रुपये तर स्वत:चे १ लाख रुपये मानधन असेल असे सांगितले. त्यानंतर अजय शर्मा याने त्याच्या बँक खात्यात सहा लाख रुपये जमा केले.

…आमिषा आली नाही म्हणून मध्यस्थाला धमक्या!

मात्र १४ नोव्हेंबरला झालेल्या कार्यक्रमाला अमिषा पटेल उपस्थित राहिली नाही. त्यामुळे अजय शर्माने त्याच्याकडे सहा लाख रुपयांची मागणी सुरू केली होती. यावेळी तक्रारदाराने पैसे देण्यास नकार देत त्यांना कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले. याचदरम्यान त्यांना एका अज्ञात व्यक्तीने दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिली होती. ‘अजय शर्मा यांना ६ लाख रुपये दिले नाही, तर आम्हाला १० लाख रुपये द्यावे लागतील. ही रक्कम दिली नाही, तर परिणाम वाईट होतील’, अशी धमकी दिली. या धमकीनंतर त्यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक दया नायक यांची भेट घेतली होती. त्यांना घडलेला प्रकार सांगून तिथे संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार देखील केली होती.

चौघांना अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी

याप्रकरणी खंडणीचा गुन्हा नोंद होताच संजय वोर्पे याच्यासह त्याच्या ३ सहकार्‍यांना अंधेरी येथील लिंक रोडवरील इन्फिनिटी मॉल गेटसमोरून पोलिसांनी अटक केली. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी एक टाटा सफारी कार जप्त केली आहे. पोलीस तपासात अमिषाने कार्यक्रमासाठी दिलेले पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी तक्रारदाराला खंडणीसाठी धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे. चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -