‘रग्णवाहिका वेळेवर आली नाही, रुग्णाचा घरीच गुदमरून मृत्यू’

coronavirus in mumbai
प्रातिनिधिक छायाचित्र

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या भिवंडी बायपास जवळील टाटा आमंत्रा येथे कोरोनावर उपचार घेऊन गेल्या मंगळवारी घरी आलेल्या रुग्णाला श्वास घेण्याकरिता तीव्र त्रास होऊ लागला. मोहने येथे राहणाऱ्या रुग्णाची दमछाक झाल्याने ते घरीच मृत्युमुखी पडले. उपचारार्थ त्यांना घेऊन जाण्याकरिता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वॉर रुमणे तब्बल दोन तासांनी रुग्णवाहीका हवी का? अशी विचारणा केली आहे.

साधारण वीस दिवसांपूर्वी मोहने येथील सुरेश नामदेव थोरात यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांच्या कुटुंबियांना समवेत विलगीकरण कक्षात दाखल केले होते. परिवारातील त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी हे तिघे जण निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र सुरेश थोरात (वय ६७) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना टाटा आमंत्रा येथे उपचारार्थ दाखल केले होते. येथे दहा दिवस उपचार घेतल्यानंतर गेल्या मंगळवारी त्यांना घरी सोडण्यात आले होते.

थोरात यांना दम लागणे, श्वासोश्वास घेण्यास त्रास होत असल्याने सुमित आणि अमित यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. याबाबत अ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांना परिस्थितीची जाणीव करून दिली असता त्यांनी त्यांच्याकडील तीनही गाड्या टिटवाळा येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनीच पालिका प्रशासनाने स्थापित केलेल्या वॉर रूमशी संपर्क साधून मोहने येथील रुग्णाला गाडीची व्यवस्था करण्यास सांगितले. मात्र रुग्ण दगावल्यानंतर तब्बल दोन तासांनी वॉर रूममधून रुग्णाला घेण्यासाठी गाडी आली. टाटा आमंत्रा येथे उपचार करूनही रुग्ण दगावल्याची घटना घडल्याने उपचार घेऊन परत आलेल्या रुग्णांमध्ये या घटनेने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.