घरताज्या घडामोडीMumbai Rain: अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण

Mumbai Rain: अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण

Subscribe

मुंबईत आज सकाळपासून काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबई, ठाणे, धुळे आणि पालघरमध्ये हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. तसेच मुंबई, ठाण्यात यलो अलर्ट तर पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. अचानक आज सकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे छत्री किंवा रेकोर्ड शिवाय बाहेर पडलेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे.

परळ, लोअर परेल, माहिम, गोरेगाव, मालाड, बोरिवली या ठिकाणी अजूनही पाऊस पडत आहे. तसेच पालघर, बोईसर, डहाणू या भागातही पावसाची संततधार सुरू आहे. पुढील २ दिवसात महाराष्ट्रात पावसाची वाढ होणार असून येत्या ५ दिवसात अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

- Advertisement -

१० वर्षांमध्ये दुसऱ्यांदा नोव्हेंबरमध्ये कोसळला एवढा पाऊस

१० वर्षांमध्ये नोव्हेंबरमध्ये दुसऱ्यांदा जोरदार पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ३०.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापूर्वी २०१९ मध्ये सर्वात जास्त १०९.३ मिलीमीटर पाऊस नोव्हेंबर महिन्यात झाला होता. तर इतर वर्षात हा आकडा ५ मिली मीटरहून कमी होता.

हवामान खात्याने २१, २२ नोव्हेंबरदरम्यान सांताक्रूझ भागात २४.७ मिली मीटर पावसाची नोंद केली होती. हवामान खात्याच्या मते हा मध्यम स्वरुपाचा पाऊस होता. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांच्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव, लक्षद्वीपच्या जवळ चक्रीवादळ आहे. यामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून मुंबईसह मध्य महाराष्ट्र, कोकण मध्ये पावसाचे वातावरण आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Rains : मुंबईत ढगाळ वातावरण, काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -