मुंबई – राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माहिम मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमित राज ठाकरे यांनी ऐन निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ते निवडणूक का लढत आहेत, हे उघड केले आहे. महाराष्ट्रात ठाकरे घराण्याच्या दोन पिढ्या या प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरल्या नाही. त्यांनी निवडणूक न लढताच राजकारण केले आहे. मात्र आदित्य ठाकरे यांच्यानंतर अमित राज ठाकरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला. 2009 पासून त्यांचा पक्ष राज्यात विधानसभा निवडणुका लढत आला आहे. मात्र राज ठाकरे हे त्यांचे काका आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणेच कधीही प्रत्यक्ष निवडणुकींच्या मैदानात उतरले नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी कायम संसदीय राजकारणाच्या बाहेर राहून सत्तेवर कंट्रोल केला होता. राज ठाकरे यांचे राजकारणही आतापर्यंत त्याच धाटणीचे राहिले आहे. अपवाद ठरले फक्त आदित्य आणि उद्धव ठाकरे. चुलत भावानंतर अमित ठाकरे यांनीही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाऊल ठेवले आहे. महिम मतदारसंघातून ते निवडणूक लढत आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि शिवेसना ठाकरे गटाचे महेश सावंत यांचे आव्हान आहे.
रिमोट कंट्रोलचे राजकारण मी करु शकत नाही…
अमित ठाकरे यांनी ‘कर्ली टेल्स’च्या कामिया यांच्या केलेल्या गप्पांमध्ये निवडणूक का लढत आहे, याचे कारण सांगितले. माहिम मतदारसंघातून निवडणूक लढत असलेले अमित ठाकरे म्हणाले की, ” निवडणुकीच्या राजकारणाबद्दल बोलायचे झाल्यास बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील – राज ठाकरे यांच्याप्रमाणे मी नाही. त्यांच्यासारखे माझे व्यक्तीमत्व नाही. काही गोष्टी तुम्ही स्वीकारल्या पाहिजे. रिमोट कंट्रोल प्रमाणे मी निवडणूक नाही लढू शकत. माझा तेवढा कंट्रोल नाही. हे दोघेच (बाळासाहेब आणि राज ठाकरे) असे नेते आहेत की ज्यांनी कधाही निवडणूक लढली नाही, बाहेर बसून मुख्यमंत्री बसवू शकतात. त्यांचा (बाळासाहेब) मुख्यमंत्री होता आणि यांचा (राज ठाकरे) भविष्यात असेल.
अमित ठाकरे म्हणाले की, मला पक्षात काम करायचे आहे. या प्रक्रियेचा भाग बनून मी राहाणार आहे. तेव्हा मी विचार केला की मी इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये सहभागी झाले पाहिजे. तुम्ही तीन-चार महिन्यांपूर्वी मला विचारले असते तर तेव्हा असा काही विचार नव्हता. पण पक्षालाही माझी गरज आहे, हे लक्षात घेऊन मी निवडणुकीच्या राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
कामिया यांनी रविवार सकाळचा नाश्ता राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासोबत केला. यावेळी त्यांच्यासाठी बटाट्याचे थालीपीठ, भाजणीचे वडे, दडपे पोहे, शिरा, साबूदाणा वडा, उपमा अशी मराठी खाद्य पदार्थांची मेजवाणी होती.
हेही वाचा : Congress : भाजपाकडून महाराष्ट्राशी भेदभाव; मोदींच्या राजवटीत, फक्त उद्योगपती अदानीच सेफ – प्रियंका गांधी
Edited by – Unmesh Khandale