CoronaVirus: कोरोनाबाधित रुग्णांच्या घरांमधून सरासरी १० ते १२ रुग्णांची भर

अत्यंत दाटीवाटीने आणि झोपडपट्टी परिसरात असलेल्या या कुर्ला 'एल' विभागांमध्ये कोरोनाबाधित रुग्णाकडून तसेच त्यांच्या कुटुंबांकडून माहिती लपवली जात असल्याने याचा संसर्ग रोखण्यात मोठ्या अडचणी येत आहे.

मुंबईतील कुर्ला ‘एल’ विभागतील कोरोनाग्रस्तांची संख्या आता झपाट्याने वाढत असून येथील कोरोनाग्रस्तांनीही ४००चा पल्ला गाठला आहे. अत्यंत दाटीवाटीने आणि झोपडपट्टी परिसरात असलेल्या या कुर्ला ‘एल’ विभागांमध्ये कोरोनाबाधित रुग्णाकडून तसेच त्यांच्या कुटुंबांकडून माहिती लपवली जात असल्याने याचा संसर्ग रोखण्यात मोठ्या अडचणी येत आहे. विशेष म्हणजे एकेका घरातून १० ते १२ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण या भागातून आढळून येत आहेत.

कुर्ला ‘एल’ विभागातील पाईप रोड, कुरेशी नगर, जरीमरी, हरि मस्जिद, राजीव नगर, अशोक नगर आदी विभागांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. एकेका घरातून १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. विशेष म्हणजे कोरोनाबाधितांच्या अतिनिकटच्या संपर्कातील व्यक्ती हे पॉझिटिव्ह होत असून ९० टक्के रुग्ण हे अति निकटच्या संपर्कातील असल्याचे बोलले जात आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या अतिनिकटच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती लपवली जात असल्याने या विभागातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४००च्या पार झाली आहे.

या विभागात आतापर्यंत ११५ बाधित क्षेत्र आहे. तर कोरोनाबाधित रुग्णाच्या अतिनिकटच्या संपर्कातील सुमारे ७०० आणि दुरच्या संपर्कातील सुमारे १२५० रुग्ण आदींना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर सुमारे ४० हून अधिक रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात येत असले तरी एकप्रकारे जेलमध्ये पाठवण्यात येत असल्याची भावना येथील लोकांची असल्यामुळे त्यांच्याकडून महापालिकेला सहकार्य केले जात नाही.
महापालिकेच्या ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त मनिष वळंजु यांनी याबाबत स्पष्ट करताना, येथील लोकवस्ती ही दाटीवाटीची आहे. त्यामुळे विशेषत: झोपडपट्टी भागांमध्ये याचा संसर्ग अधिक पसरु नये याची काळजी घेतली जाते. आरोग्य केंद्रांचे डॉक्टर, नर्सेस तसेच आरोग्य सेविका यांचे पथक प्रत्येक झोपडपट्टीत फिरुन रुग्णांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही लोकांनी जर खरी माहिती दिली तर शोधणे सोपे जाते. परंतु बऱ्याचदा बाधित कुटुंबाच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीचीही माहिती लपवली जाते. त्यामुळे लोकांना विश्वासात घेवून काम करावे लागते. लोकांना समजावून सांगितले तर ते ऐकतात. त्यामुळे आता लोकांमध्ये तशी जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे हा आकडा कमी राखण्याचा प्रयत्न केला जात, असे त्यांनी सांगितले.

मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

कुर्ल्यातील एका इमारतीत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे तेथे १४ दिवसांचे क्वारंटाईन करण्यात आले. परंतु १३ दिवस होताच आणखी एक रुग्ण आढळून आल्यानंतर येथील क्वारंटाईन वाढवण्यात आला. त्यामुळे येथील रहिवाशी हवालदिल झाले होते. काहींना अधिकच मानसिक धक्का असला होता. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांच्या माध्यमातून येथील रहिवाशांना काऊन्सिलींग करण्यात आले. त्यामुळे एकप्रकारे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अशा मार्गाचाही अवलंब करण्यात आला येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.