Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमShare Trading Fraud : शेअर ट्रेडिंगच्या नावाने 11 कोटींची फसवणूक; सायबर ठगांना...

Share Trading Fraud : शेअर ट्रेडिंगच्या नावाने 11 कोटींची फसवणूक; सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्‍या आरोपीस अटक

Subscribe

शेअर ट्रेडिंगच्या नावाने वयोवृद्धाची सुमारे 11 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीस दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. कैफ इब्राहिम मंसुरी असे या 31 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याने सायबर ठगांना मोठ्या प्रमाणात बँक खाती पुरविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

मुंबई : शेअर ट्रेडिंगच्या नावाने वयोवृद्धाची सुमारे 11 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीस दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. कैफ इब्राहिम मंसुरी असे या 31 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याने सायबर ठगांना मोठ्या प्रमाणात बँक खाती पुरविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी विविध बँकेच्या खातेधारकांचे 33 डेबिट कार्ड, बारा बँकांचे चेकबुक जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले. (an elderly person duped for 11 crore in the name of share trading; accused who provided bank accounts to cyber thugs arrested)

तक्रारदार वयोवृद्ध असून जहाजातून कॅप्टन म्हणून निवृत्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना एका व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. त्यात शेअर ट्रेडिंगसंदर्भात माहिती अपडेट करुन त्यांना शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळेल असे सांगण्यात आले होते. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी शेअरमध्ये सुमारे अकरा कोटीची गुंतवणूक केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Crime : मुंबईत वैमानिक तरुणीची आत्महत्या; प्रियकराला पोलिसांनी घातल्या बेड्या

या गुंतवणुकीनंतर मूळ रकमेसह परताव्याची रक्कम न देता या सायबर ठगांनी त्यांची फसवणूक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती.

- Advertisement -

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुरेश भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन त्रिमुखे, पोलीस हवालदार खान, गलांडे यांनी तांत्रिक माहितीवरुन कैफ मंसुरीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. कैफ हा मोहम्मद अली रोड, नूर पॅलेस इमारतीमध्ये राहतो. तो काही सायबर ठगांच्या संपर्कात होता. त्यानेच या सायबर ठगांसाठी विविध बँकेत खाती उघडून दिले होते. याच बँक खात्यात ऑनलाईन फसवणुकीची रक्कम जमा होत होती. त्यानंतर कैफ ही रक्कम काढून सायबर ठगांना देत होता. त्या बदल्यात त्याला या सायबर ठगांकडून काही रकमेचे कमिशन मिळत होते.

कैफकडून पोलिसांनी 33 बॅंकांचे डेबिट आणि बारा बँकांचे चेकबुक सापडले. तपासात तक्रारदाराने वेगवेगळ्या 22 बँक खात्यात सुमारे अकरा कोटी रुपये ट्रान्स्फर केली होती. त्यापैकी एका बँक खात्यात सहा लाख रुपये जमा झाले होते. ही रक्कम काढण्यासाठी कैफने एका महिलेला बॅंकेत पाठविले होते. या महिलेचा शोध घेतल्यानंतर तिच्या चौकशीतून कैफचे नाव समोर आले. कैफला ताब्यात घेतल्यानंतर त्याने तो सायबर ठगांसाठी काम करत असल्याचे तसेच त्यांच्यासाठी विविध बॅंकेत खाती उघडून देण्यास मदत करत असल्याचे सांगितले. त्याच्या पाच बँक खात्यात फसवणुकीची सुमारे 44 लाख रुपयांची कॅश जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले. ही रक्कम त्याने सायबर ठगांना दिली होती. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले. (an elderly person duped for 11 crore in the name of share trading; accused who provided bank accounts to cyber thugs arrested)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -