घरमुंबईआनंद दिघेंचे  स्वप्न अधुरेच , 20 वर्षांत मंदिराची  एक वीटही रचली नाही 

आनंद दिघेंचे  स्वप्न अधुरेच , 20 वर्षांत मंदिराची  एक वीटही रचली नाही 

Subscribe

टेंभी नाक्याची हीच इमारत गेली  २० वर्षे मंदिराच्या प्रतीक्षेत उभी आहे.

ठाण्यातील टेंभी नाक्याच्या भवानी मातेचे एक भव्य मंदिर उभे करावे, अशी ठाण्याचे दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांची इच्छा होती. आज टेंभी नाक्याच्या भवानीची नवरात्रात जेथे प्राणप्रतिष्ठा होते, ती जागाही मिळाली होती. तेथील रहिवाशांनीही जागा खाली करण्याचे स्वेच्छेने मान्य केले. मात्र आनंद दिघेंवर काळाने घाला घातला. ते अचानक या जगातून निघून गेले आणि मंदिर रखडले. गेल्या २० वर्षांत मंदिराची एक वीटही रचली नाही.
ज्यांना आनंद दिघेंनी मोठे केले त्या शिवसेनेच्या सध्याच्या नेत्यांनाही मंदिराचा विसर पडला आणि त्यांचे स्वप्ने अधुरेच राहिले, अशी चर्चा  या निमित्ताने ठाण्यात नाक्यानाक्यावर सुरू आहे.
ठाण्यातील टेंभी नाक्याच्या नवरात्रोत्सवाची भव्यता आणि आरास ही ठळक वैशिष्ठ्ये आहेत. ही आरास आणि भव्यता दिघे यांनी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई यांच्या गणेशोत्सवातून घेतली असल्याचे सांगितले जाते. दगडूशेठ हलवाई यांच्या गणेशोत्सवामध्ये जशी आरास देखावा केला जायचा तशीच आरास आणि देखावा आनंद दिघे देवीसाठी करायचे. अनेक वेळा स्वत: दगडूशेठ या उत्सवाकरिता हजेरी लावायचे.
पुण्यातील दगडूशेठ यांच्या गणेशोत्सवाची अजून एक खासियत म्हणजे गणेशोत्सवादरम्यान बसवली जाणार्‍या गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही. ती पुन्हा मंदिरात विराजमान होत असते. विसर्जनाकरिता छोटीशी मूर्ती खास तयार करण्यात येते. त्याच पद्धतीने दिघे यांनी टेंभी नाक्यावर भवानी मातेचे एक भव्य मंदिर उभारण्याची संकल्पना आखली होती. मंदिरात कायमस्वरुपी भवानी मातेची मूर्ती स्थापित करण्याचा त्यांचा मानस होता. ही मूर्ती केवळ नवरात्रोत्सवाच्या कालावधीत मुख्य मंडपात ठेवायची आणि उत्सव झाला की मिरवणुकीद्वारे पुन्हा मंदिरात स्थापित करायची.
पुण्याच्या दगडूशेठ गणेशोत्सवाचा पायंडा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ठाण्यात सुरू करण्याचा प्रयत्न दिघे यांनी केला होता. पहिल्या वर्षी देवीची प्राणप्रतिष्ठा ज्या ठिकाणी करण्यात आली होती, त्या जागेचे मालक वसंत पुरुषोत्तम ठक्कर यांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ ती जागा दिघेंच्या संस्थेस दान केली. त्या जागेवर भव्य मंदिर उभे करण्याचा दिघे यांनी संकल्प केला. त्यासाठी त्यावेळचे सर्वच कार्यकर्ते कामाला लागले. या जागेवर काही भाडेकरू होते. जे स्वत:हून ती जागा रिकामी करून द्यायला त्यावेळी तयार झाले.
परंतु तेव्हाच आनंद दिघेंचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने मंदिराची संकल्पना कागदावरच राहिली. आज 20 वर्षांचा कालावधी होऊनही या जागेवर असलेल्या इमारतीची एक वीटही लागलेली नाही. ही इमारत अतिशय जीर्ण होऊन मोडकळीस आली आहे. मात्र प्रस्थापित नेत्यांनी दिघेंच्या या इच्छेकडे डोळेझाक केल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.
दिघे यांच्या हयातीत टेंभी नाक्यावरचा हा नवरात्रोत्सव संपूर्ण ठाण्यातला एकमेव उत्सव होता. मात्र त्यांच्या जाण्यानंतर ठाण्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी आपआपले उत्सव सुरू केले. राजन विचारे यांनी जांभळी नाक्यावर चैत्र नवरात्रोत्सव, रविंद्र फाटक यांचा किसन नगर येथील नवरात्रोत्सव, एकनाथ शिंदे यांचा कोपरीतील चैत्र नवरात्रोत्सव असे स्वतंत्र उत्सव सुरू झाले. या सर्व गदारोळात टेंभी नाक्यावरील मंदिराची आनंद दिघे यांची इच्छा आजही अपूर्णावस्थेतच आहे.
श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या कार्यकारिणीत संस्थापक आनंद दिघे, अध्यक्ष -दिलीप सदाशिव देहेरकर, उपाध्यक्ष -भालचंद्र काशिनाथ घुले, खजिनदार -उत्तमचंद उमेदमल सोलंकी, सेक्रेटरी -वल्लभ रामजी मजेठीया, रमेश भुरमल परमार, विश्वस्त -भुरमल छोगालाल जैन, दिपक वसंतजी ठक्कर हे होते. त्यांच्यापैकी आता केवळ अध्यक्ष देहेरकर, उपाध्यक्ष घुले आणि खजिनदार उत्तमचंद हेच हयात आहेत. अध्यक्ष देहेरकर यांना स्मृतिभ्रंश झाल्याने ते बिछान्यावरून उठत नाहीत. तर घुले आणि उत्तमचंद जेमतेम आपला कार्यभाग सांभाळत आहेत. त्यामुळे आता ट्रस्टीच्या माध्यमातून मंदिराची निर्मिती अशक्यच आहे. आता काही चमत्कार झाला तरच दिघे साहेबांच्या संकल्पनेतील हे मंदिर उभे राहील, अन्यथा सद्य स्थितीत ठाण्यातील कोणत्याच नेत्याला याबद्दल आस्था राहिली नसल्याची चर्चा ठाणेकर करीत आहेत.
आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या दोन वर्षे अगोदर आम्ही सर्व ट्रस्टी एकत्र येऊन त्यावेळच्या नवरात्रोत्सवाच्या दरम्यान भवानी मातेसमोर पाणी सोडून आम्ही प्रशस्त मंदिर उभारण्याचा संकल्प केला होता. ठाण्याची शान ठरावी असे भव्य दिव्य मंदिर बांधण्याची दिघे साहेबांची इच्छा होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दोन वर्षातच दिघे आम्हाला सोडून गेले. त्यानंतर ट्रस्टमधील इतर लोकांचेही निधन झाले. त्यामुळे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. परंतु आता आम्ही मंदिर निर्माणाकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्याशी चर्चा करीत आहोत. मंदिराकरिता असलेल्या जागेच्या मागील जागा, तसेच महापालिकेची शाळा या मंदिरासाठी मिळावी याकरिता आमचे प्रयत्न सुरु आहेत. जेणेकरून ठाण्यातील सर्वात भव्य दिव्य असे मंदिर ज्याचे स्वप्न स्वर्गीय आनंद दिघे यांनी पाहिले होते, उभे राहील. 
–  उत्तमचंद उमेदमल सोलंकी, खजिनदार, 

श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था. 

टाऊन प्लानिंगच्या हिशोबाने सध्या मंदिराची निर्मिती करावी लागणार आहे. एवढ्या मोठ्या जागेवर प्रशासन मंदिरासाठी परवानगी देईल का हा देखील प्रश्न आहे. शिवाय ट्रस्टीला मिळालेली जागा, या जागेवर असलेल्या भाडेकरूंचाही प्रश्न आहे. मागील अनेक वर्षांपासून ते आपला व्यवसाय इथे करीत आहेत. आम्हाला इथून विस्थापित करू नका, अशी त्यांची मागणी आहे. यामधून काही मार्ग निघेल का, याबद्दल सध्या चर्चा सुरु आहे. लवकरच यातून मार्ग निघेल आणि आई भवानीच्या आशिर्वादाने या मंदिराच्या कामाची सुरुवात होईल.  
– भालचंद्र काशिनाथ घुले, उपाध्यक्ष,

श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था. 

आनंद दिघे या नावात एक वलय होते. या नावामुळे अनेक कामे सहजपणे व्हायची. पण त्यांच्या जाण्याने विस्कळीतपणा आला आहे. म्हणूनच मंदिराकडेही दुर्लक्ष झाले. मात्र आता हे कार्य दृष्टीपथास आहे. काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र त्यावर तोडगा निघेल.  
-कमलेश चव्हाण, विभागप्रमुख (टेंभी नाका) शिवसेना. 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -