जर धारावी जिंकली, तर देश जिंकेल; आनंद महिंद्रा नक्की असं का म्हणाले?

anand mahindra sadened by the protest og aganipath offers jobs to agniveer after service

देशात कोरोनामुळे अडीच लाखाहून जास्त रुग्ण कोरोना बाधित झालेले असताना उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनी मात्र धारावीशी देशातल्या परिस्थितीची तुलना केली आहे. यासंदर्भात त्यांनी केलेलं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. ‘जर धारावी जिंकली, तर भारत जिंकेल. त्यांना आपल्या प्रोत्साहनाची, प्रार्थनांची गरज आहे’, असं आनंद महिंद्रा आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. राधिका रामास्वामी नावाच्या एका व्यक्तीच्या ट्वीटला उत्तर देताना आनंद महिंद्रांनी असं ट्वीट केलं आहे. धारावीत गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत आणि नवे कोरोनाबाधित सापडण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर आनंद महिंद्रांचं हे ट्वीट आलं आहे.

१ जून रोजी धारावीमध्ये ३४ कोरोनाबाधित सापडले होते. आता ७ जूनला फक्त १३ बाधित सापडले आहेत. याआधी ६ जूनला १०, ५ जूनला १७ आणि ४ जूनला २३ बाधित सापडले होते. त्यामुळे अगदी महिन्याभरापूर्वीपर्यंत धारावीत दिवसाला ७० ते ८० रुग्ण सापडत असताना गेल्या आठवड्याभरापासून ही संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. शिवाय, गेल्या आठवड्याभरात धारावीत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. आजघडीला धारावीत एकूण १९२४ कोरोनाबाधित असून त्यातल्या ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीची परिस्थिती वेगाने बदलत असल्यामुळे राधिका रामास्वामी यांनी यासंदर्भात ट्वीट केलं होतं. त्यावर आनंद महिंद्रांची ही प्रतिक्रिया आली आहे.

आनंद महिंद्रा आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून अनेक सामाजिक आवाहन करणारे ट्वीट करतात. काही दिवसांपूर्वीच आनंद महिंद्रांनी एक दगड आणि त्यावरून गेलेला पाईप दाखवणारा फोटो ट्वीट करून त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या. त्यावर नेटिझन्सचा मोठा प्रतिसाद दिसून आला होता.