घरमुंबईअंधेरी आग : 'मी झोपेतच होतो आणि अचानक काळोख झाला'

अंधेरी आग : ‘मी झोपेतच होतो आणि अचानक काळोख झाला’

Subscribe

अंधेरीच्या मरोळ भागात असलेल्या कामगार हॉस्पिटलमध्ये संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत आत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यातूनच जीव वाचलेल्या एका रुग्णाची ही आपबीती...

‘मी माझ्या बेडवर झोपलो होतो. वॉर्डमध्ये नेहमीप्रमाणे काही पेशंट दुपारचं जेवण आटोपून झोपले होते. पण कसलातरी गलका झाला आणि माझी झोप उघडली. पण डोळ्यांसमोरचं काही दिसत नव्हतं. सगळाच अंधार होता. तो धूर होता!’… अंधेरीच्या मरोळ भागामध्ये असलेल्या कामगार हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीतून वाचलेल्या रुग्णाचे हे शब्द! संध्याकाळी चारच्या सुमारास आग लागली आणि आख्ख्या मुंबईचं लक्ष मरोळकडे लागलं. कारण आग रुग्णालयात लागली होती. जिथे शंभरहून जास्त रुग्ण उपचार घेत होते. त्यांचे शेकडो नातेवाईक होते..आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स आणि हॉस्पिटलचा इतर स्टाफ होता.

वेळीच झोप उघडली, नाहीतर…

आगीचा भडका उडाल्यानंतर सुदैवाने काही मिनिटांमध्येच गिरीश पटेल हॉस्पिटलमधून बाहेर आले. पण काही मिनिटांचा देखील उशीर त्यांच्या जिवावर बेतू शकला असता. कारण आग तिसऱ्या मजल्यावर पसरली, तेव्हा पटेल गाढ झोपेत होते. त्यांची पत्नी त्यांच्यासोबत होती. वेळीच त्यांची झोप उघडली आणि त्यांचा जीव वाचला.

- Advertisement -

हेही वाचा – काय घडलं कामगार हॉस्पिटलमध्ये!

‘वायर जळाल्याचा प्रचंड वास येत होता’

गिरीश पटेल यांनीच त्यांची आपबीती ‘माय महानगर’शी बोलताना कथन केली. पटेल सांगतात, ‘मी तिसऱ्या मजल्यावर १० नंबरच्या वॉर्डमध्ये होतो. दुपारची वेळ असल्यामुळे नेहमीप्रमाणे झोपलो होतो. गेल्या १५ दिवसांपासून मी इथे उपचार घेत आहे. माझ्या अंदजे तीन-साडेतीन वाजले असतील. अचानक सगळीकडे धूर झाला. मी तर झोपलो होतो. पण जेव्हा जाग आली तेव्हा सगळीकडे पसरलेला धूर दिसला. काही कळायच्या आत लाईट बंद केले गेले. अंधार पसरला. वायर जळाल्याचा खूप वास येत होता. हळूहळू धूर वाढत होता. वॉर्डमध्ये धावाधाव झाली. गोंधळ उडाला. सगळे इकडे-तिकडे पळायला लागले.’

‘आग पसरली आणि धावाधाव झाली’

गिरीश पटेल यांच्या वॉर्डमध्ये अजूनही अनेक रुग्ण होते. त्यातले कोण वाचले? कोण जखमी झाले? याची पटेल यांना काहीही माहिती नाही. पण ते स्वत: कसे वाचले, हे मात्र त्यांना स्पष्ट आठवतं. ते म्हणाले, ‘वॉर्डमध्ये जशी धावाधाव झाली, तसे आम्ही देखील बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधायला लागलो. कुणाला शिडी मिळाली, कुणाला नाही मिळाली. पण ज्यांना मिळाली, ते एकमेकांचा हात धरून रांगेत शिडीवरून खाली उतरले. पण वायर जळाल्याचा खूप जास्त वास येत होता.’

- Advertisement -

अग्निसुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

गिरीश पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना वायर जळाल्याचा खूप वास येत होता. त्यामुळे आगीचं कारण शॉर्ट सर्किटच होतं, या तर्काला बळ मिळतंय. अर्थात, अद्याप आगीचं कारण जरी अस्पष्ट असलं, तरी यामध्ये रुग्णालयांमधल्या अग्निसुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे हे मात्र निश्चित.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -