घरमुंबईबाळासाहेबांची शपथ घेतो, माझ्यावरील आरोप खोटे

बाळासाहेबांची शपथ घेतो, माझ्यावरील आरोप खोटे

Subscribe

कोणत्याही एजन्सीने माझी चौकशी करावी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता या प्रकरणात सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बची चर्चा सुरू झाली आहे. सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अ‍ॅड. अनिल परब यांच्यावर देखील खंडणी वसूल करण्याची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपाला आता खुद्द अनिल परब यांनीच पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेय. जे बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहेत त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, की सचिन वाझेंनी केलेले आरोप खोटे आहेत. मला आणि ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठीच हे आरोप करण्यात आले आहेत. मी कोणत्याही चौकशीला तयार असून माझी नार्कोटेस्ट केली तरी चालेल.

सचिन वाझेंचे आरोप आहेत की जून आणि जानेवारीमध्ये मी त्यांना सांगितले होते. मग इतक्या दिवसांमध्ये त्यांनी यावर काहीही सांगितले नाही. परमबीर सिंग यांच्याही पत्रामध्ये याचा कुठेही उल्लेख नाही. पण मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणे गरजेचे आहे हा एका धोरणाचा भाग आहे. यातून सरकारला बदनाम करण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे. त्यामुळे एनआयए, सीबीआय, रॉ, नार्कोटेस्ट अशा कोणत्याही चौकशीला सामोरा जायची माझी तयारी आहे, असे परब पत्रकार परिषदेत म्हणाले.

- Advertisement -

सचिन वाझेंनी पहिला आरोप केलाय की एसबीयुटी प्रकल्पाच्या ट्रस्टींकडून मी ५० लाख रुपये मागितले. त्यांनी दुसरा आरोप केलाय की जानेवारी २०२१ला मी मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना त्यांना दिल्या. या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी त्या नाकारतोय. मी सच्चा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाहीत, असे ते म्हणाले.

सचिन वाझेच्या कोठडीत वाढ

- Advertisement -

मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझेच्या एनआयए कोठडीत न्यायालयाने २ दिवसांची म्हणजे ९ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तसेच मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बडतर्फ पोलीस शिपाई विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना २१ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याप्रकरणी एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला अटक केली होती. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांना अटक करण्यात आली होती. बुधवारी या दोन्ही प्रकरणातील तिघा आरोपींची एनआयए कोठडी संपली होती. तिघांना बुधवारी एनआयएच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -