अनिल परब यांच्या वांद्रे येथील अनधिकृत कार्यालयावर हातोडा

वांद्रे येथील म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक ५७ व ५८ येथील मोकळ्या जागेत हे कार्यालय होते. हे कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार सोमय्या यांनी लोकायुक्तांसमोर केली होती. त्यानंतर म्हाडानेही हे बांधकाम पाडण्याची नोटीस दोन वेळा परब यांना दिली होती.

 

मुंबईः ठाकरे गटाचे आमदार व माजी मंत्री अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे. उद्या मी तेथे भेट देणार आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी ट्विट करुन दिली.

वांद्रे येथील म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक ५७ व ५८ येथील मोकळ्या जागेत हे कार्यालय होते. हे कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार सोमय्या यांनी लोकायुक्तांसमोर केली होती. त्यानंतर म्हाडानेही हे बांधकाम पाडण्याची नोटीस दोन वेळा परब यांना दिली होती. मात्र परब यांनी हे बांधकाम पाडले नाही. परब यांनी हे बांधकाम नियमित करण्यासाठी म्हाडाकडे प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव म्हाडाने फेटाळून लावला. त्यामुळे सोमय्या पुन्हा म्हाडाला पत्र लिहून हे बांधकाम पाडण्याची मागणी केली. त्याची दखल घेत म्हाडाने हे बांधकाम पाडण्याचे आदेश जारी केले. या आदेशानुसार सोमवारी हे बांधकाम पाडण्यात आले.

किरीय सोमय्या यांनी अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याची तक्रार केली आहे. या रिसॉर्टचे बांधकाम करताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी दापोली न्यायालयाने नुकताच परब यांना जामीन मंजूर केला आहे.

साई रिसाॅर्ट (sai resort) बेकायदा असल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोम्मया यांनी याची पोलिसांत तक्रार केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे हे रिसाॅर्ट बांधण्यात आल्याचा आरोप सोम्मया यांनी केला आहे. २०१७ मध्ये अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी भूखंड विकत घेतला आणि कोरोनादरम्यान लॉकडाऊनच्या काळात या शेतीच्या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्याचे काम केले, असा आरोप आहे.

जमीन खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी २०१९ मध्ये याची नोंदणी झाली. २०२० मध्ये  मुंबईतील केबल ऑपरेटर आणि शिवसेनेचे माजी खासदार रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ही जमीन १.१० कोटींना विकण्यात आली. हे रिसाॅर्ट बेकायदा आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन करुन या रिसाॅर्टचे बांधकाम करण्यात आले आहे. राज्य शासनाचा महसुलही बुडाला आहे. त्यामुळे अनिल परब यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोम्मया यांनी केली होती.  याप्रकरणी अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात खेड न्यायालयाकडून परब यांना अंतरिम जामीनही मंजूर झाला आहे. त्यानंतर दापोली न्यायालयानेही परब यांना जामीन मंजूर केला.