घरमुंबईवन विभागाने पकडलेले प्राणी-पक्षीही आता राणीबागेत

वन विभागाने पकडलेले प्राणी-पक्षीही आता राणीबागेत

Subscribe

लिमूर आणि नेपाळी पोपटला प्राणिसंग्रहायलात मिळाले स्थान

भायखळा राणीबाग प्राणिसंग्रहालयाच्या नुतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आल्याने विविध पक्षी आणि प्राण्यांचे पिंजरेही तयार झाले आहे. त्यामुळे आता मुंबईत वन विभागाकडून पकडण्यात आलेले पक्षी व प्राण्याची आता थेट राणीबागेत रवानगी होणार आहे. राणीबागेच्या नुतनीकरणानंतर आतापर्यंत नेपाळी पोपट आणि विदेशातील लिमूर हे आता वन विभागाने प्राणिसंग्रहालयाच्या ताब्यात सोपवले आहे.

भायखळा येथील वीर जिजामाता भोसले प्राणिसंग्रहालयाच्या (राणीबाग)नुतनीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेतल्यानंतर पूर्णत्वास येत आहे. आजवर या प्राणिसंग्रहालयात मुंबईतील अनेक भागांमध्ये वन विभागाने पकडलेले प्राणी व पक्षी राणीबागेत पाठवले जात नव्हते. परंतु आता हे जप्त केलेले पक्षी व प्राणी राणीबागेत मोठ्या विश्वासाने पाठवले जात आहे.

- Advertisement -

मुंबईत बर्‍याचप्रमाणात प्राणी व पक्षी छुप्या पध्दतीने नियम डावलून आणले जातात. हे पक्षी व प्राणी वन विभागाच्यावतीने पकडले जातात. परंतु पकडण्यात आलेले हे पक्षी व प्राणी कुठे ठेवायचे हा प्रश्न वनविभागाला असतो. बर्‍याचवेळा पक्ष्याला तसेच प्राण्याला इजा झालेली असते. त्यामुळे अशाप्रकारचे पशु जंगलात मोकळे सोडून दिल्यास त्यांना विहार करताना अडचणी येवू शकतात, परिणामी इतर प्राणी व पक्ष्यांकडून त्याला मारले जावू शकते. त्यामुळे असे पक्षी व प्राणी मोकळे सोडून न देता ते प्राणिसंग्रहालयात पाठवून त्यांचे सरंक्षण करणे आवश्यक असते. त्यामुळेच मुंबईत वन विभागाने जप्त तसेच पकडलेले पक्षी व प्राणी आता राणीबागेत पाठवले जात आहेत.

वन विभागाने आतापर्यंत २ नेपाळी पोपट तसेच एक लिमूर हा विदेशी प्राणी राणीबागेत पाठवले आहेत. विमानतळावर परदेशी पर्यटकाकडून हा लिमूर जप्त करण्यात आला होता. त्यानंतर तो राणीबागेतील अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आला आहे. मात्र,अशाप्रकारे जप्त तसेच पकडलेले पक्षी व प्राणी राणीबागेत ठेवण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक असते.

- Advertisement -

त्यानुसार पोपट व लिमूर राणीबागेत ठेवण्यासंदर्भात प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मागण्यात आली असून भविष्यात अशाप्रकारे पक्षी व प्राणी वन विभागाने ताब्यात दिल्यास तेही स्वीकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भात वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहायालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वन विभागाच्यावतीने पकडण्यात केलेले पक्षी व प्राणी राणीबागेत पाठवले जात आहेत. यापूर्वी अशाप्रकारे पक्षी व प्राणी पाठवले जात नसत. परंतु आता प्राणिसंग्रहालयाचे नुतनीकरण झाल्यानंतर असे प्राणी पाठवले जात आहेत. अशाप्रकारचे प्राणी व पक्षी राणीबागेत पाठवल्यास पिंजर्‍यांच्या उपलब्धतेनुसार व सुविधेनुसार स्वीकारले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -