घरमुंबईविद्यार्थी घडविणारा अवलिया जोगेश्वरीतील अंकुश परब सर!

विद्यार्थी घडविणारा अवलिया जोगेश्वरीतील अंकुश परब सर!

Subscribe

जोगेश्वरी पूर्वेतील झोपडपट्टीबहुल मध्यमवर्गीय क्षेत्रात विद्यादानाचे पवित्र काम करणारे आणि हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणारे अंकुश परब सरांचे अचानक निघून जाणे मनात चटका लागून गेले. सुमारे ३० वर्षांपूर्वी त्यांनी परब क्लासेसच्या माध्यमातून सुरू केलेले विद्यार्थी घडवण्याचे काम डोळ्यासमोर तरळू लागले. अंकुश परब… मध्यमवर्गीय चाळ संस्कृतीत वाढलेले व्यक्तिमत्व! शालेय-महाविद्यालयीन प्रवास दर्जेदारच… प्रचंड गुणवत्ता असलेले व्यक्तिमत्त्व. १९८६ सालच्या शैक्षणिक वर्षात इस्माईल युसुफ महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून प्रथम येण्याच्या मान त्यांना मिळाला. त्यांच्या गुणवत्ता इतके होती की, ते सहज मास्टर ऑफ कॉमर्सची पदवी, आयसीडब्ल्यू ही पदवी मिळवून एक सुखवस्तू आयुष्य जगू शकत होते. मात्र, ते न करता त्यांनी जोगेश्वरीसारख्या मध्यमवर्गीय क्षेत्रात विद्यार्थी घडवण्याचा, त्यांचे जीवन सुखासीन बनवण्याचा विडा उचलला. त्यांनी स्वतः पुढे न शिकता इतर विद्यार्थींना शिकविण्याचा संकल्प केला आणि तेव्हापासून परब क्लास चा जन्म झाला.

क्लास काढायचा ठरला तरीही उद्देश व्यवसाय करणे नव्हता तर जोगेश्वरीसारख्या मध्यमवर्गीय-कष्टकरी वर्गातील शिकणारी मुले मराठी माध्यमातून पुढे भाषेमुळे त्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन त्यांनी तेच शिक्षण मराठीत सोपे करून विद्यार्थीसमोर आणले. तेव्हापासून अनेक विद्यार्थींना शिक्षणात रूची वाटू लागली. मराठी तरूणांचे घोळके परब क्लासेस या एका तेव्हाच्या म्हणजे ३० वर्षापूर्वीच्या ज्ञानदानाच्या मंदिराकडे आशेने पाहू लागील. अतिशयोक्ती ठरू नये पण अंकुश सर आम्हाला कधी शिक्षक वाटलेच नाहीत. एक घरातील मोठा भाऊ, एक निर्मळ मनाचा मित्र म्हणूनच भावले आणि त्यामुळे सरस्वती देखील आमच्यावर प्रसन्न होऊन आमच्या प्रयत्नातून यश देवू लागली.

- Advertisement -

आज त्यांच्या या ज्ञानदानाच्या छायेखाली असंख्य विद्यार्थी तेव्हा पदवीधर झाले परिणामी त्यांना इच्छित अशा चांगल्या नोकर्‍या मिळू लागल्या. जोगेश्वरी पूर्व येथील राणे वाडीतील एका छोट्याश्या खोलीतून पेटविलेला हा ज्ञानाचा दिवा समर्थपणे त्यांचे बंधू लवू परब हे देखिल सांभाळत होते. खरे म्हणजे या पवित्र शिक्षण सेवेतून नकळत ते समाजाशी एवढे जोडले गेले की या कामाबरोबर त्यांनी समाजसेवेसही स्वत:ला वाहून घेतले. शिवसेनाप्रमुखांवर असलेल्या निःस्सिम श्रद्धेमुळे कोणतेही राजकारण न करता तेव्हा ४०/- रूपये शुल्क स्वीकारून अनेकांना शिकवून त्यांच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करून दिले.

शिक्षणाच कोणताही व्यवसाय न करता ते दान म्हणूनच त्यांनी सतत त्याची उधळण केली. अनेक आठवणी आज झंझावातासारख्या नजरेसमोर येतात आणि सर आज आपल्यात नाहीत या एकाच भावनेने मन उदास होते. ‘विद्या विनयेन शोभते’ हे सुभाषित अंकुशसर केवळ स्वत: जगले नाहीत तर त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना तसे जगायला शिकवले. केवळ विद्यादानच नव्हे तर त्यांच्या सरळ आणि विनम्र स्वभावामुळे त्यांनी समाजात देखील आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. प्रसिद्धीच्या मागे न लागता त्यांनी समाजकार्य ही सुरु ठेवले. परब क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी केवळ विद्यार्थीच घडविले नाहीततर आपले एक कुटुंबच तयार केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपल्यातील अफाट बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यांनी माणुसकीचे वैभव तयार केले आणि ज्ञानदाना सारखे धन उधळत राहिले आणि त्या ज्ञानातून त्यांनी अनेकांना प्रकाशमय केले.

- Advertisement -

जो इतरांसाठी जगला तो खर्‍या अर्थाने जगला. आज त्यांचे कुटुंबीय जरी दु:खात असले तरी सरांच्या अनेक आठवणी त्यांनी केलेली ही सेवा निरंतर आपणास बळ देत राहील. त्यांनी सुरु केलेला हा ज्ञानदानाचा प्रपंच यापुढेही त्यांचे बंधू लव परब सर व सहकारी सुरु ठेवतील कदाचित त्यात ही अनेकांची स्वप्ने दडलेली असतील आणि तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.आम्हाला घडविणार्‍या या उत्तुंग व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन !
– अनिल म्हसकर, विद्यार्थी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -