घरताज्या घडामोडीअंबरनाथ रेल्वे स्थानकात महिला टीसीवर हल्ला

अंबरनाथ रेल्वे स्थानकात महिला टीसीवर हल्ला

Subscribe

एका महिला टीसीने महिला प्रवाशाला तिकीट दाखवण्याची विचारणा केल्यानंतर टीसीवर हल्ला करण्यात आला आहे. अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली. मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेवरील फुकट्या प्रवाशांना आवर घालण्याचे काम तिकीट तपासणीस करत असतात. दोन दिवसांपूर्वीच वेगवेगळ्या ठिकाणी दोन टीसींना रुळावर ढकलण्यात आले होते. एकाच आठवड्यात ही तिसरी घटना घडल्यामुळे आता तिकीट तपासणीसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीन वर नम्रता शेंडगे या तिकीट तपासणीसाठी कर्तव्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी मिनल घुले नामक महिला प्रवाशाकडे तिकीट दाखविण्याची मागणी केली. मात्र महिला प्रवाशाने शेंडगे यांचे केस ओढून त्यांना स्टेशनच्या बाहेर खेचत नेले. हा पुर्ण प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ५३ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये महिला प्रवाशाने शेंडगे यांच्यावर हल्ला केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

- Advertisement -

या घटनेनंतर महिला टीसी नम्रता शेंडगे म्हणाल्या की, “मी फक्त त्यांच्याकडे तिकीट दाखविण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्या महिलेने स्वतःच्या बॅगेत तिकीट शोधायला सुरुवात केली. दरम्यान मी इतर प्रवाशांकडे तिकीटाची विचारणा करायला सुरुवात केली. मात्र तेवढ्यातच ती महिला प्रवाशी संतप्त झाली आणि माझे केस खेचून तिने माझ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात माझ्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.”

या प्रकरणानंतर आरोपी महिला प्रवाशाला अटक करण्यात आली असून कल्याण जीआरपीचे पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. आरोपी महिलेची पोलिसांनी चौकशी केली असताना पोलिसांशीही ती उद्धटपणे वागली असल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -