मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष हे नाव व धनुष्यबाण चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे सैनिक नाराज झाले. याच वातावरणात शिंदे गटाने आज विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेतले. त्यामुळे आता मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवू नये, यासाठी सोमवारी सकाळपासूनच दिवसभर उद्धव ठाकरे गटाचे माजी महापौर, माजी सभागृह नेत्या, माजी नगरसेवकांनी पक्ष कार्यालयाबाहेर खडा पहारा दिला. तर, दोन्ही गटात काही राडा होऊ नये यासाठी पोलिसांनी महापालिका मुख्यालयात चार मोठ्या गाड्या भरून पोलीस फौजफाटा तैनात केल्याने पालिका मुख्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिल्याने उद्धव ठाकरे व शिंदे गटातील तणावात आणखीन मोठी भर पडली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून कालपासून मुंबईत निदर्शने सुरू आहेत. शिंदे गटावर उद्धव सेनेच्या नेत्यांकडून जोरदार टीका सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटामध्ये जल्लोष सुरू आहे. त्यामुळे आता त्याचे पडसाद राजकोय वर्तुळात उमटू लागले आहेत. (Appearance of Police Camp to Mumbai Municipal Headquarters Thackeray group staunch guard)
उद्धव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोध दर्शवत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर शिंदे गटाने इकडे विधीमंडळातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावर हल्लाबोल करीत ते कार्यालय ताब्यात घेतले. त्यामुळे आता शिंदे गट पुन्हा एकदा मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यासाठी पालिकेत धडक देईल, या भीतीने उद्धव ठाकरे गटाकडून माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, स्नेहल आंबेकर, माजी सभागृहनेत्या विशाखा राऊत, माजी नगरसेवक अनंत नर,उपेंद्र सावंत, सचिन पडवळ, अरुंधती दुधवडकर, निधी शिंदे, उर्मिला पांचाळ, संध्या दोशी आदींनी सोमवारी दुपारी १२ नंतर पालिका मुख्यालयात धाव घेतली व शिवसेना पक्ष कार्यलयाबाहेर दिवसभर खडा पहारा ठेवला.
सायंकाळी उशिरापर्यंत तरी शिंदे गटाचे कोणीही माजी नगरसेवक शिवसेना पक्ष कार्यलयाकडे फिरकलेच नाहीत. मात्र शिंदे गटात गेलेले आमदार दिलीप लांडे हे आज सायंकाळच्या सुमारास पालिका मुख्यालयात आले होते. मात्र पालिका आयुक्त कार्यालयाच्या दिशेने गेले. तेही शिवसेना कार्यालयाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे कोणताही वादविवाद झाला नाही पम दिवसभर शिवसेना पक्ष कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण होते.
ते अंगावर आले तर शिंगावर घेऊ – विशाखा राऊत
“शिवसेनेत जरी फूट पडली असली तरी शिंदे गटात फक्त ४-५ माजी नगरसेवक गेले आहेत. तर उर्वरित म्हणजे जवळजवळ ९० पेक्षाही जास्त माजी नगरसेवक आमच्याकडे म्हणजे उद्धव ठाकरे गटात आहेत. त्यामुळे त्यांनी जबरदस्तीने कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही ४-५ जण आहात तर त्यांना पालिकेने थोडीशी जागा वेगळी द्यावी. आमचे काहीही म्हणणे नाही. मात्र आमचे नगरसेवक सर्वात जास्त असल्याने त्यांनी उगाच जबरदस्तीने कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी यावे आणि चर्चा करावी. पण ते जर आमच्या अंगावर चालून येणार असतील तर आम्हीही त्यांना शिंगावर घेणारच”, असा इशारा विशाखा राऊत यांनी शिंदे गटाला दिला आहे.
आयुक्त कसे काय शिंदे गटाला आमचे कार्यालय देऊ शकतील – विश्वनाथ महाडेश्वर
मुंबई महापालिकेत आमचे नगरसेवक जास्त आहेत. असे असताना आयुक्त इकबाल चहल यांनी, कोणत्या नियमखाली आम्हाला दिलेले पक्ष कार्यालय अचानक सील ठोकून बंद केले? आणि आता जर ते बंद केले आहे तर ते कार्यालय कोणत्या नियमाने ते शिंदे गटाच्या फक्त ४-५ माजी नगरसेवकांना देतील? या शिवसेना कार्यालयात आम्हालाच बसू द्यायला पाहिजे, अशी जळजळीत प्रतिक्रिया माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – माझं काय चुकलं? पहाटेच्या शपथविधीवर भगतसिंह कोश्यारींची प्रतिक्रिया