वाहन चालकाच्या एका जागेसाठी ५०० उमेदवारांमध्ये स्पर्धा

BMC
मुंबई महानगरपालिका

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या आस्थापनेवरील वाहन चालकांच्या ६५ जागांसाठी महापालिकेने मागवलेल्या जाहिरातीत तब्बल ३२ हजार ५०० उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेष वाहन चालकाच्या एका जागेसाठी ५०० उमेदवारांमध्ये स्पर्धा लागली आहे. या सर्व अर्जांची छाननी आता सुरु असून त्यातील पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

६५ जागांसाठी मागवले अर्ज 

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ६५ जागांसाठी महापालिकेने २८ एप्रिलपर्यंत उमेदवारांकडून स्पीड पोस्टद्वारे अथवा ई-मेलद्वारे अर्ज मागवले होते. त्यानुसार एकूण ३२ हजार ५०० उमेदवारांकडून स्पीडपोस्ट, इ-मेल तसेच थेट महापालिका मुख्यालयातील पेटींमध्ये अर्ज प्राप्त झाले. वाहन चालकांच्या या पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण अशी होती. तसेच त्यांच्याकडे प्रादेषिक परिवहन कार्यालयाचे अर्थात आरटीओचे हलके अथवा जड वाहन चालवण्याचा परवाना असावा आणि हा वैध परवाना किमान दोन वर्षे जुना असणे आवश्यक आहे. तसेच खासगी किंवा निमशासकीय खात्यांमध्ये नियमित अथवा कंत्राटी पद्धतीने वाहन चालवण्याचा दोन वर्षाचा अनुभव असावा अशा प्रकारची अट होती. या सर्व प्राप्त अर्जांच्या छाननीचे काम सध्या सुरू असून लवकरच यांची पात्र उमेदवारांची यादी प्रदशित केली जाणार असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेने यापूर्वी ११४ पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. या ११४ पदांसाठी १ लाख ५६ हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर आता ६५ वाहन चालक पदांसाठी ३२ हजार ५०० उमेदवार प्राप्त झाल्याने आजही बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून सरकारी नोकरीकडे अजूनही उमेदवारांचा कल असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

हेही वाचा –

महाराष्ट्र दिनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट; राज्यातील सर्वांवर होणार मोफत उपचार