घरमुंबईगावांच्या पायाभूत सुविधांसाठी 46 कोटींच्या कामांना मान्यता

गावांच्या पायाभूत सुविधांसाठी 46 कोटींच्या कामांना मान्यता

Subscribe

पनवेल महानगरपालिकेच्या पार पडलेल्या महासभेत पनवेलमधील 29 गावांपैकी सुरुवातीला चार गावे स्मार्ट व्हिलेज होणार असून गावांच्या पायाभूत सुविधांसाठी 46 कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेने 29 गावांपैकी धानसर, कोयनावेळे, करवले आणि रोडपाली या गावात महासभेत मंजूर झालेल्या 46 कोटी रुपयांमध्ये टप्प्याटप्प्याने मूलभूत सुविधा पुरवण्याची कामे हाती घेण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने पहिल्या टप्प्यात स्ट्रीट लाईट, जलनिस्सारण, मल:निसारण, भूअंतर्गत विद्युत पुरवठा आणि रस्त्याच्या कामांचा समावेश असल्याचे महासभेत पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महासभेच्या सुरुवातीला काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सुरुवातीला रायगड आयकर विभागीय अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी अद्ययावत झालेल्या आयकर प्रणालीविषयी माहिती सदस्यांना दिली. त्याचबरोबर पालिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय नागरी उपजीविका योजनेची माहिती देण्यात आली. प्रश्नोत्तरच्या तासात विविध सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. निलेश बाविस्कर यांनी पालिका क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या 51 शाळा पालिकेत समाविष्ट करण्याची सूचना मांडली. त्याला उत्तर देताना आयुक्त देशमुख यांनी सांगितले की, सुरुवातीला पालिकेत या शाळा समाविष्ट करण्याचा कुठलाही विचार नव्हता, परंतु यातील पाच शाळांची डागडुगी करण्यात येणार असून शाळा समावेशाचा निर्णय शासन घेत असल्याने पालिकेला तो अधिकार नाही. यावर राज्य शासन निर्णय घेईल.अरविंद म्हात्रे यांनी नावडे गावातील बंद अवस्थेतील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुरू करण्याची मागणी केली असता त्या ठिकाणचे कॅमेरे दुरुस्त करण्यास खर्च तेवढाच येणार असल्याने त्या ठिकाणी नवीन कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. प्रकाश बिनेदार यांनी पालिका क्षेत्रातील दलित वस्त्या किती असल्याचे विचारल्यावर लवकरच सर्व्हे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली.

- Advertisement -

महासभेत ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली असून त्याचबरोबर शहरातील बगीचे, पार्किंगच्या निविदा प्रक्रियेस मान्यता देणे, अशा अनेक विषयांना मंजुरी देण्यात आल्याने शहर आणि ग्रामीण भागाची वाटचाल स्मार्ट सिटीकडे निश्चितपणे सुरू झाली आहे.
– गणेश देशमुख – आयुक्त, पनवेल महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -