अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

arnab goswami

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह अन्य दोन आरोपींना अलिबागच्या सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नीतेश सारडा या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बुधवारी सकाळी अलिबाग पोलिसांनी गोस्वामी यांना वरळीतील त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांना घेऊन पोलीस सकाळी 11 वाजता अलिबाग सत्र न्यायालयात पाहचले. दुपारी 12 वाजता गोस्वामी यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी आपणास मारहाण केली, मी जखमी झालो आहे, त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात यावे, अशी विनंती गोस्वामी यांनी यावेळी केली. यामुळे पोलीस ठाण्यातच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

दरम्यान तीनही आरोपींनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर न्यायालयाने पोलिसांनी आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. दरम्यान, नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून या तिघांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा तपास थांबविण्यात आला होता. परंतु नाईक यांची मुलगी आणि पत्नी यांनी या प्रकरणाचा तपास पुन्हा करण्यात यावा, अशी विनंती राज्य सरकारकडे केली होती. या प्रकरणाचा तपास सीआायडीतर्फे करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते. बुधवारी सकाळी पोलिसांनी गोस्वामी यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानातून ताब्यात घेतले.

रात्री 10.30 पर्यंत चाललेल्या सुनावणीत गोस्वामी यांची बाजू ज्येष्ठ वकील अबाद कोंडा यांनी व्हीसीद्वारे, तर शेख आणि सारडा यांची बाजू अॅमड. गौरव पारकर आणि अॅखड. सुशील पाटील यांनी मांडली. सरकारतर्फे अॅीड. रूपेश महाकाळ यांनी काम पाहिले.