मुंबई : मुंबईत दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. यंदा 19 सप्टेंबर रोजी श्रीगणेशाचे आगमन होणार आहे. त्यानंतर दीड, पाच, 10, 11, 21 दिवसांनी श्रीगणेश मूर्तींचे विधिवत समुद्र, खाडी, नद्या, कृत्रिम तलाव आदी ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक समुद्र,खाडी, तलाव आदी 69 ठिकाणी आणि 191 कृत्रिम तलाव व 15 फिरते कृत्रिम तलाव यांची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे, पालिकेने विसर्जन स्थळी नियंत्रण कक्ष, मनोरे, जीवरक्षक, मोबाईल शौचालये, आरोग्य यंत्रणा तैनात केली असून बेस्टने शहर भागात विद्युत व्यवस्था केली आहे.(Arrival of Lord Ganesha municipal system ready for immersion Artificial lake at 191 places)
मुंबई पोलिसांनीही शहर व उपनगरे येथील चौंकाचौकात, मंडळाच्या ठिकाणी, रस्त्यांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मुंबईत गतवर्षी विसर्जित सार्वजनिक गणेशमूर्तीची संख्या 9,967 तर घरगुती गणेश मूर्तींची संख्या 1,76,300 एवढी आणि गौरींची संख्या 6,795 एवढी म्हणजे एकूण संख्या 1,93,062 एवढी नोंदविण्यात आली होती. त्यामध्ये, कृत्रिम तलावांतील विसर्जित सार्वजनिक गणेशमूर्तींची संख्या 1,822 तर घरगुती गणेशमूर्तींची संख्या 61,985 आणि गौरींची संख्या 2,320 एवढी म्हणजे एकूण 66,127 एवढी नोंदविण्यात आली होती. यंदा गणेश मूर्तीच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चहल यांनी केल्या सूचना
मुंबईसह राज्यातील गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सर्वत्र पोलीस, पालिका, शासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. मुंबईत महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार महापालिका व इतर प्राधिकरणाचे प्रतिनिधी यांची पूर्वतयारीबाबत बैठका घेऊन अगोदरपासूनच यंत्रणा तैनात केली आहे.
हेही वाचा : भातसा धरणाचे पाचही दरवाजे 0.50 मीटरने उघडले; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कृत्रिम तलावांची संख्या वाढवली
गतवर्षी कृत्रिम तलावांची संख्या 154 एवढी होती. मात्र यंदा त्यामध्ये 37 ने वाढ करून कृत्रिम तलावांची संख्या 191 एवढी करण्यात आली आहे. यंदाही गिरगाव, दादर, जुहू आदी 69 नैसर्गिक विसर्जन स्थळी प्रकाश योजना, 3 हजार हून अधिक फ्लड लाईट, आरोग्य पथक, रुग्णवाहिका, सुरक्षारक्षक, जीवरक्षक, बोटी, जर्मन तराफे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, विसर्जन स्थळी यंदा मोफत वाहन पार्कींगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोफत शौचालय व्यवस्थाही करण्यात आली आहे. निर्माल्य गोळा करण्यास उपयोगी ठरणारे 357 हून अधिक निर्माल्य कलश व निर्माल्य वाहने, सुरक्षा व्यवस्थेसाठी निरिक्षण मनोरे, चौपाट्यांवर श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांची चाके वाळूमध्ये रुतू नयेत, यासाठी पोलादी प्लेटची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा : कोकणात जाणाऱ्या गाड्या 3 ते 4 तास उशीरा; दिवा रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची मोठी गर्दी
विसर्जन ऑनलाइन सुविधा
श्रीगणेश मूर्ती विसर्जन ऑनलाइन नोंदणी सुविधा ही https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे गिरगाव चौपाटी परिसरात हेलिकॉप्टर, ड्रोन आदींची सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे.