घरमुंबईघाटकोपर येथे भर रस्त्यात दोन "कृत्रिम तलाव"?

घाटकोपर येथे भर रस्त्यात दोन “कृत्रिम तलाव”?

Subscribe

मुंबई -: मुंबई महापालिका प्रशासनाच्या मेहेरबानीने घाटकोपर (पूर्व ) स्टेशन नजीक पंतनगर येथे भर रस्त्यात खोलगट भाग तयार होऊन त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने जणू पालिकेनेच दोन ठिकाणी ‘कृत्रिम तलाव’ बांधले आहेत की काय, अशी विचारणा व कुजबुज नागरिकांमध्ये सुरू आहे.

विशेष म्हणजे घाटकोपर (पूर्व) हा विभाग स्टेशन परिसर म्हणजे जवळजवळ गुजराती श्रीमंत व्यापारी बांधवांची सोसायटी. सध्या घाटकोपर (पूर्व) भागात मोठ्या प्रमाणात जुन्या इमारती जमीनदोस्त करून त्या ठिकाणी उंच टॉवर बांधण्याची कामे जोरात सुरू आहेत. एक – एक इमारत नवीन राजवाड्यासारख्या उभ्या राहत आहेत. पंतनगर, वनिता विकास महाविद्यालयाच्या पाठीमागील भागात यशवंत जाधव मार्गाच्या पुढील भागात भर रस्त्यात खोलगट भाग तयार होऊन तेथे पावसाचे पकानी साचल्याने ते ‘कृत्रिम तलाव’ आहे की काय, अशी शंका नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
विशेष बाब म्हणजे त्या पुढे थोडं चालत गेल्यास विशाल रेसिडेन्सी बिल्डिंग, पंतनगर येथे तर भर रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत.

- Advertisement -

तर त्यापुढे थोडं चालत भाजी मार्केट परिसरात गेल्यास आशापुरा इंटरप्रायजेससमोरही भर रस्त्यावर खोलगट भाग तयार झाल्याने ‘कृत्रिम तलाव’ निर्माण झाल्याचे दिसून येते. या परिसरातील नागरिकांना भर पावसात बाजारहाट करणे मुश्किल होते. त्यातच एखादी चारचाकी वाहन भर रस्त्यावर साचलेल्या त्या कृत्रिम तलाव सदृश्य जागेतून जरा वेगात गेल्यास महिला, पुरुष, तरुण- तरुणी, ज्येष्ठ नागरिक यांच्या स्वच्छ कपड्यांवर साचलेले पाणी उडते व कपड्यांवर डागच डाग पडतात. या पाण्यात वाहनांचे रस्त्यावर पडलेले इंधन मिक्स होत असल्याने त्याचे डाग कपड्यांना चांगला साबण लावून धुतल्यास तरीही डाग लवकर जात नाहीत. त्यामुळे पालिका ‘एन’ प्रभाग रस्ते विभागाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन तात्काळ कृती करायला पाहिजे. डांबरी रस्त्यावरील खोलगट भागात आणखीन डांबर मिश्रित खडी टाकून त्यावर रोलर फिरवून रस्त्याचे सपाटीकरण करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पालिका प्रशासन रस्त्यांच्या कामांसाठी दरवर्षी २ – ३ हजार कोटी रुपये खर्च करते. रस्त्यावर खड्डे पडल्यास ते बुजविण्यासाठी आणखीन काही कोटींचा खर्च करण्यात येतो, तर मग रस्त्यावर खड्डे, कृत्रिम तलावासारखी परिस्थिती का उद्भवते, असे प्रश्न जनतेकडून उपस्थित करण्यात येत आहेत. पंतनगर परिसरातील नागरिकांना रस्त्यांवरील खड्डे व कृत्रिम तलाव सदृश्य परिस्थितीतून कधी दिलासा मिळणार, असा सवाल घाटकोपरवासी उपस्थित करीत आहेत.


धनुष्यबाण कुणाचा?, ठाकरे गटाला उद्या दुपारी 2 पर्यंतची मुदत; आयोगाकडून उद्धव ठाकरेंना पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -