Aryan Khan Drugs Case: नवाब मलिकांनी वानखेडेंवरील आरोप थांबवण्याच्या मागणीची याचिका हायकोर्टाने फेटाळली

नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्यावर होणारे आरोप थांबवा अशी मागणी करणारी एक याचिका मुंबईतील मौलाना जाफर अली सय्यद यांनी हायकोर्टात दाखल केली होती.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबी ऑफिसर समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून दररोज नव नवीन आरोप होत आहेत. नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्यावर होणारे आरोप थांबवा अशी मागणी करणारी एक याचिका मुंबईतील मौलाना जाफर अली सय्यद यांनी हायकोर्टात दाखल केली होती. मात्र ही याचिका हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली असून याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. पुढील आठवड्यात सुट्टीकालीन कोर्टासमोर दाद मागण्याचे निर्देश मुख्य न्यायमूर्तींनी दिले आहेत.

काय आहे याचिका?

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात आर्यनसह इतर आरोपीच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरू असली तरी मंत्री नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्यावर दररोज नवीन आरोप करण्यात येत आहे. एकीकडे आर्यन खानसह इतर आरोपींच्या जामिनासाठी सुनावणी सुरू असताना दुसरीकडे नवाब मलिक विरुद्ध एनसीबी आणि समीर वानखेडे असा वाद सुरू झाला. गेली अनेक दिवस नवाब मलिक समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक कागदपत्रे सादर करुन नवीन खुलासे करत आहेत.  समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर करण्यात येणारे आरोप नवाब मलिक यांनी तात्काळ थांबवावे आणि यासंबंधी हायकोर्टाने त्यांना निर्देश द्यावे अशी मुख्य मागणी असणारी याचिका मौलाना जाफर अली यांनी दाखल केली होती. या याचिकेत राज्य सरकार आणि केंद्र सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. ही याचिका मुख्य न्यायमूर्ती दिपांग दत्ता यांच्या खंडपिठाकडे सादर करण्यात आली होती. परंतु यावर तातडीने निकाल देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. पुढील आठवड्यात सुट्टीकालीन कोर्टासमोर किंवा दोन आठवड्यांनी कोर्टाचे नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर यावे असे हायकोर्टाकडून सांगण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया समीर वानखेडेंचा मित्र

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करत आहेत. पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर नवीन आरोप करत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया समीर वानखेडेंचा मित्र असल्याचे म्हटले आहे. हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया क्रूझ पार्टीत होता ज्याला सोडण्यात आले असल्याचा नवा आरोप नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केला आहे. पुढे नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, क्रूझ ड्रग्ज पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया त्याच्या प्रेयसीसोबत होता. त्याची प्रेयसी बंदूक घेऊन उभी होती. ड्रग्ज माफिया दाढीवाला असून त्याची प्रेयसी पार्टीत नाचनाता देखील दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्ज माफिया तिहार जेलमधील असून ड्रग्ज पार्टी उधळल्यानंतर दाढीवाल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाला सोडण्यात आले. हा ड्रग्ज माफिया समीर वानखेडेंचा मित्र असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.


हेही वाचा – Cruise Drugs Case: आर्यनकडून २५ कोटी खंडणी प्रकरणात समीर वानखेडेंची चौकशी सुरु, ५ अधिकाऱ्यांची टीम NCB कार्यालयात दाखल