Aryan khan Drugs case- आता एनसीबीचे शाहरुखच्या ‘मन्नत’वर सर्च ऑपरेशन

मुंबईच्या समुद्रातील रेव्ह पार्टीप्रकरणात बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली असून आज पुन्हा आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन अडकल्याने हे प्रकरण हायप्रोफाईल झालं आहे. दरम्यान, ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्या घरी एनसीबीने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. यामुळे आता शाहरुखच्या मन्नतवरही एनसीबीचे सर्च ऑपेरशन होणार असून या प्रकरणात आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्यन खानच्या मोबाईल संभाषण आणि व्हॉट्अॅप चॅटमधून अनेक महत्वपूर्ण पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. आर्यन गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याची माहितीही यातून समोर आली आहे. आर्य़नने या दरम्यान विविध देशातही ड्रग्ज घेतल्याचे चॅटमधून समोर आले आहे. आर्यन त्याचा जवळचा मित्र अरबाज मर्चंट याच्याकडून ड्र्ग्ज घ्यायचा. पण अरबाजकडे ड्र्ग्ज यायचे कुठून याची माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे. यामुळे या पॅडलर्सचा शोध घेण्यासाठी एनसीबीने कालपासून नवी मुंबईपासून दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. याप्रकरणात आर्यनही आरोपी असल्याने त्याच्या घरी म्हणजे मन्नतवरही एनसीबीचे अधिकारी कोणत्याही क्षणी धडकण्याची शक्यता आहे. यामुळे बॉलीवूडमध्येही खळबळ उडाली असून न्यायालयात आर्यनला जेल मिळणार की बेल याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे.