जे. जे. रुग्णालय ऑफलाईन; रुग्ण बेहाल

ECG machine will available in every department of j.j hospital

राज्य सरकारच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णांच्या उपचाराचा तपशील जतन करता यावा यासाठी २००९ पासून जे. जे. रुग्णालय, जी. टी. रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय आणि कामा रुग्णालयासह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सरकारी रुग्णालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने काम सुरू करण्यात आले. मात्र सरकारच्या चालढकल वृत्तीमुळे ऑनलाईन कामाचे कंत्राट वाढवण्यात न आल्याने रुग्णांची नोंदणी करणे, रक्त तपासणी, एक्सरे यांच्या अहवालासाठी तासंतास रखडावे लागत आहे. यामुळे अनेक शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्याने रुग्ण बेहाल झाले आहेत.

राज्यातील जे. जे. रुग्णालय, जी. टी. रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय आणि कामा रुग्णालयासह विविध जिल्ह्यांतील सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची नोंद करणे, रक्त तपासणी, एक्सरे करून त्याचे संकलन करण्यासाठी एचआयएमएस डिजिटल सेवा सुरू करण्यात आली. कंत्राटी पद्धतीने राबवण्यात येणार्‍या या सेवेची मुदत २०१५ मध्ये संपुष्टात आली. मात्र त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून दर सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देऊन ही सेवा चालवण्यात येत होती. मात्र ५ जुलैच्या मध्यरात्रीपासून राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील ही सेवा बंद करण्याचे आदेश वैद्यकीय विभागाच्या आयुक्तांकडून देण्यात आले. त्यामुळे ही ऑनलाईन सेवा बंद करून प्रत्यक्ष सेवा देण्यास सुरुवात झाली. मात्र याचा सर्वाधिक फटका रुग्णांना बसत असल्याचे दिसून येत आहे.

जे. जे. रुग्णालयात दररोज २५०० ते ३००० हजार रुग्ण बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी येत आहेत. या रुग्णांना केस पेपर काढण्यासाठी तब्बल पाऊण तास रांगेत ताटकळावे लागत आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांनी रक्त तपासणी, एक्स रे किंवा एमआरआय, सीटी स्कॅन करण्यास सांगितल्यास रुग्णांची अवस्था भीक नको, पण कुत्रे आवर अशी होते. रक्त तपासणीचा अहवाल मिळवण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कधी विभाग क्रमांक ८ तर कधी ७, ७ अ तर कधी मुख्य इमारतीमधील मुख्य प्रयोगशाळेत पळवण्यात येते. मात्र येथे गेल्यावरही रुग्णांना धड उत्तर मिळत नसल्याने त्यांना काय करावे हेच समजत नाही. या प्रत्येक विभागामध्ये रुग्णांना अहवाल घेण्यासाठी साधारणपणे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ ताटकळावे लागत आहे. बर्‍याच रुग्णांना वेळेत अहवाल मिळत नसल्याने अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची अवस्था अधिकच बिकट होत आहे.

एक्सरेचा मोबाईलवर दिला जातो फोटो
एचआयएमएस डिजिटल सेवा सुरू असताना रुग्णाचा काढलेला एक्सरे थेट डॉक्टरांच्या कॅम्प्युटरवर दिसत असे. मात्र ही सेवा बंद झाल्यापासून एक्सरे विभागाकडे फिल्म नसल्याने रुग्णांचा काढण्यात येणार्‍या एक्सरेचा फोटो त्यांना काढून घेण्यास सांगण्यात येतो. त्यामुळे स्मार्ट फोन नसलेल्या रुग्णांना एक्सरे मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

रुग्णालय प्रशासनाकडून खोटा दावा
रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून करण्यात येणारे वैद्यकीय उपचार, विविध तपासण्या, रक्त तपासण्या या पूर्वीच्या डिजिटल सेवेपेक्षा कमी वेळात शीघ्र गतीने रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती जे. जे. रुग्णालयातील स्त्री रोग प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक आनंद यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला होती. मात्र प्रत्यक्षात त्यात तथ्य नसल्याचे रुग्णांकडून सांगण्यात येत आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार डिजिटल सिस्टीम (एमआयएचएस) बंद करण्यात आली आहे. मात्र रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत. ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्ष पद्धतीने काम वेगाने होत आहे. लवकरच नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.
– पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय