लॉकडाऊन शिथिल होताच दरोडेखोर, लूटमार करणाऱ्या टोळ्या सक्रिय

शहरातील या तिन्ही घटनांमधील टोळ्यांना मागील २४ तासात अटक करण्यात आली आहे.

शासनाने लॉकडाऊन शिथिल करताच शहरामध्ये चोर, दरोडेखोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्यांनी एटीएम सेंटर, बंद कारखाने, दुकानाना आपले लक्ष केले आहे. मुंबईतील कुर्ला, ठाण्यातील शीळडायघर, उल्हासनगर येथे लूटमार करणाऱ्या टोळ्या मुंबई आणि ठाणे पोलिसांनी जेरबंद केल्या आहेत. कुर्ला पोलिसांनी मोबाईल फोनचे दुकान लुटणारी टोळीतील ४ जणांना अटक केली असून ठाणे गुन्हे शाखेने एटीएम लुटणारी टोळी जेरबंद केली आहे, तसेच उल्हासनगर पोलिसांनी एका टोळीला कारखान्यावर दरोडा घालण्यापूर्वीच अटक केली आहे. शहरातील या तिन्ही घटनांमधील टोळ्यांना मागील २४ तासात अटक करण्यात आली आहे.

राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने २१ मार्चपासून लॉकडाऊन घोषित केल्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात गुन्हेगारीत घट झाली होती. कोरोनाच्या भीतीने म्हणा अथवा रस्त्यावर २४ तास बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांच्या भीतीने मागील ३ महिने गुन्हेगार टोळ्या भूमिगत झालेल्या होत्या. मात्र, ८ मे पासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणतात या टोळ्यांनी आपले डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे.

कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या टॉप टेन मोबाईल शॉप मध्ये ७ मे रोजी पहाटेच्या सुमारास एका टोळीने दुकानाचे शटर गॅस कटरने कापून ८ लाख रुपयांची लूट केली होती. या टोळीतील ४ लुटारूना कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी धारावीत राहणारी असून फेरीवाले बनून ही टोळी दुकानाची रेकी करून लूटमार करीत होती अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान मुंब्रा शीळ डायघर येथील दहिसर नाका याठिकाणी ८ मे रोजी एका टोळीने एटीएम मशीन तोडून सुमारे १८ लाख रुपयांची रोकड चोरी करून पोबारा केला होता. या टोळीतील सूरज म्हात्रे (२९), अतुल दवणे (२२), सूरज कांबळे (२४), फुलाजी गायकवाड (३६) या चौकडीला पनवेल, अंबरनाथ, तुर्भे, बेलापूर परिसरातून ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा -१च्या पथकाने अटक केली असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी भीम नेपाळी याला नेपाळमध्ये पळून जाण्यापूर्वी उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपीपैकी एक जण रिक्षाचालक असून एक सुरक्षारक्षक आहे, तर इतर दोघे मिस्त्री काम आणि झेरॉक्स दुकान चालक आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्यामुळे आर्थिक अडचणीत आल्यामुळे त्यांनी चोरी केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

उल्हासनगर येथील एका कपड्याच्या कारखान्यावर दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांच्या एका टोळीला घातक हत्यारासह अटक केली आहे. ही टोळी ज्या कारखान्यावर दरोडा घालणार होते त्या कारखान्यातील कामगारांवर हल्ला करून कारखान्यात लुटपाट करण्याचा मनसुबा या टोळीचा होता, असे चौकशीत पुढे आले आहे.