महापालिकेच्या आयुक्तपदी सरकारने अनुभवी अधिकाऱ्यांना डावलले

सरकारने विश्वास टाकत मुंबई महापालिकेचा दांडगा अनुभव असलेल्या मनिषा म्हैसकर, आर. ए. राजीव, राजीव जलोटा, मनुकुमार श्रीवास्तव, अनिल डिग्गीकर किंवा असिम गुप्ता यांना का डावलले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार करणाऱ्या आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांना हटवून त्यांच्या जागी इक्बालसिंह चहल यांची वर्णी ठाकरे सरकारने लावली. परंतु चहल यांनी आजवर कोणत्याही महापालिकेत काम केलेले नाही किंवा मुंबई महापालिकेचा अनुभवही नाही. तरीही त्यांच्यावर सरकारने विश्वास टाकत मुंबई महापालिकेचा दांडगा अनुभव असलेल्या मनिषा म्हैसकर, आर. ए. राजीव, राजीव जलोटा, मनुकुमार श्रीवास्तव, अनिल डिग्गीकर किंवा असिम गुप्ता यांना का डावलले असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु चहल हे कोरोनाच्या संकटाची पहल दूर करून शकतात का सवाल उपस्थित होत आहे. परंतु चहल यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहताच आता कोरोनाच्या संकटात मुंबई महापालिकेत लक्ष घालणार असून त्यांच्या निर्देशानुसारच आता ते कारभार हाकत कोविड -१९चा आजार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

महापालिका आयुक्त असलेल्या प्रविणसिंह परदेशी यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी इक्बालसिंह चहल यांची वर्णी लागल्याने सर्वांचाच भुवया उंचावल्या आहेत. कोरोनाच्या महामारीचा सामना करत असताना जेव्हा आयुक्तांची बदली केली जाते. तेव्हा त्यांच्या जागी मुंबई महापालिकेचा अनुभव असलेल्या कोणा अधिकाऱ्याची वर्णी लागली जाईल, अशी शक्यता होती. परंतु प्रत्यक्षात चहल यांच्या सारख्या बिगर अनुभवी अधिकाऱ्याची वर्णी लावत सरकारने सर्वांनाच धक्का दिला. विशेष म्हणजे टास्क फोर्समधील एक सदस्य असलेल्या मनिषा म्हैसकर यांनी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून यशस्वी कारकिर्द पूर्ण केली. आपल्या कार्यकाळात त्यांनी आरोग्य विभागाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती.

एमएमआरडीएचे आयुक्त असलेल्या आर.ए. राजीव यांनी प्रथम सहआयुक्त व त्यानंतर अतिरिक्त आयुक्त अशी जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यांना मुंबई महापालिकेचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी घनकचरा व्यवस्थापन, रस्ते विकासाच्या कामांसह उद्यान विभागांच्या कामांमध्ये उल्लेखनीय कामे केली होती. तर मनुकुमार श्रीवास्तव, राजीव जलोटा आणि अनिल डिग्गीकर या तिन्ही अधिकाऱ्यांनी मुंबईच्या प्रकल्प कामांची जबाबदारी सांभाळलेली आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प बनवण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग असल्याने त्यांचा संपूर्ण पालिकेचा कारभाराची चांगलीच जाण आहे. त्यामुळे या तिन्ही अधिकाऱ्यांना महापालिकेच्या सर्वच विभागांचा मोठा अनुभव आहे.

मुंबई महापालिका ही एवढी मोठी आहे की ती आधी समजून घेईपर्यंत अनेक वर्षे उजाडतात. त्यामुळे चहल यांच्यासारख्या बिगर अनुभव अधिकाऱ्याच्या तुलनेत काही प्रमाणात अनुभवी असलेल्या अधिकाऱ्यांमधील कुणाची वर्णी लावली असती तर, महापालिकेचा कारभार समजून घेण्यासाठी अधिक काळ लागला नसता. परदेशी यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी जुळवून घेत काम केले असते तर त्यांची बदली एवढ्यात तडकाफडकी झाली नसती. परंतु परदेशी यांनी आतापर्यंत जे निर्णय आणि आदेश फिरत गोंधळ घातला आणि इतर सहकाऱ्यांना गोंधळात पाडले, त्यामुळेच त्यांची बदली करणे आवश्यक बनले गेले होते, असे काही निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे मत आहे.

चहल यांना कोणत्याच महापालिकेचे ज्ञान नाही, हे जरी खरे असले तरी त्यांना ज्ञान नसल्यानेच ते आता अजोय मेहता जे प्लॅन देतील, तेच राबवणार आहेत. अजोय मेहता यांना मुंबई महापालिकेच्या कारभाराचे व भोगोलिक परिस्थितीचे ज्ञान आहे. त्यामुळे चहल यांच्या माध्यमातून अजोय मेहता मुंबई महापालिकेत मुंबईकरांना अपेक्षित असे लक्ष देतील. शिवाय ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे, त्यांची अंमलबजावणी करून घेतील, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आजच्या घडीला अनुभवी अधिकाऱ्याचीच आयुक्त म्हणून नियुक्ती व्हावी, असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु म्हैसकर, जलोटा, राजीव, डिग्गीकर, श्रीवास्तव, गुप्ता आदींचे स्वभाव व महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाटत असणारी भीती लक्षात यासर्वांची नाव बाजुला ठेवली गेली असावी, असेही बोलले जात आहे. मात्र, चहल यांना कोरोनाचे संकट निवारण होईपर्यंत आयुक्त म्हणून ठेवून पुढे या नावापैंकी एकाचा विचार होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.