घरमुंबईघर मागितलेलं,मरण नाही

घर मागितलेलं,मरण नाही

Subscribe

हक्काच्या घरासाठी आता चिमुरडे माहुलवासीय रस्त्यावर

आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरण, राहण्यायोग्य घर, शिक्षणाचा हक्क यासाठी माहुलमधील लहान मुलांनी सोमवारी मानवी साखळी आंदोलन केले. मानवी साखळी आंदोलनामध्ये माहुलमधील मुलांबरोबरच आसपासच्या परिसरातील 100 पेक्षा अधिक मुले सहभागी झाली होती. हक्काच्या घरासाठी दीड महिन्यांपासून विद्याविहार येथील तानसा जलवाहिनीजवळ आंदोलनाला बसलेल्या माहुलवासीयांच्या समस्येकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माहुलमधील लहान मुलेही आता रस्त्यावर उतरली आहेत.

रासायनिक कंपन्या, तेलशुद्धीकरण कंपन्या यामुळे माहुलमधील वातावरण प्रदूषित झाले आहे. दिवसेंदिवस वाढत्या प्रदुषणामुळे येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. माहुलमध्ये राहणार्‍या नागरिकांना त्वचेचे आजार, केस गळणे, श्वसनाच्या विकारांचा सामना करावा लागत आहे. प्रदूषित हवेमुळे येथील इमारतीतील पाण्याच्या टाक्यांमधील पाणीही प्रदूषित होत आहे.

- Advertisement -

प्रदुषणामुळे माहुल परिसरात जन्माला येणार्‍या बालकांना जन्मत:चा आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. माहुलमधील भीषण परिस्थिती पाहून न्यायालयाने येथील नागरिकांना स्वच्छ वातावरण, स्वच्छ पाणी व राहण्यायोग्य घर द्यावे, असे आदेश दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत सरकार माहुलवासीयांना घर देण्यास टाळाटाळ करत आहे. सरकारने राहण्यायोग्य घर द्यावे, यासाठी दीड महिन्यांपासून माहुलवासीय विद्याविहार येथील तानसा जलवाहिनीजवळ आंदोलनाला बसले आहेत.

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना तीन हजारांपेक्षा अधिक पत्रे पाठवली. तसेच मोटारसायकल रॅलीही काढली. परंतु, सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. सरकार माहुलवासीयांच्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त माहुलमधील लहान मुले आपल्या सुरक्षित भविष्यासाठी रस्त्यावर उतरले. आम्हाला स्वच्छ हवा द्या, आम्हाला राहण्यायोग्य घर द्या, आम्हाला शिक्षणाचा हक्क द्या, अशा घोषणा देत माहुलमधील लहान मुलांनी सोमवारी दुपारी 3 वाजता विद्याविहार येथे मानवी साखळी उभारली. ‘जीवन बचाओ’ आंदोलनाच्या स्थळापासून सिंधू सिग्नलपर्यंत ही मानवी साखळी उभारण्यात आली होती. या साखळीमध्ये 100 पेक्षा अधिक मुले सहभागी झाली होते.

- Advertisement -
15 डिसेंबरला काढणार ‘जीवनयात्रा’

हक्काच्या घरासाठी आंदोलन करूनही सरकार दुर्लक्ष करत असल्याने ‘आर या पार’च्या लढाईचा निर्णय घेत ‘घर बचाओ, घर बनाओ’च्या प्रमुख मेधा पाटकर यांनी 1 डिसेंबरला सरकारविरोधात ‘जीवनयात्रा’ काढण्याचा इशारा दिला होता. यासाठी त्यांनी सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. परंतु, सरकारने तरीही कोणताही निर्णय न घेतल्याने 15 डिसेंबरला माहुलवासीय ‘जीवनयात्रा’ काढणार आहेत. ही ‘जीवनयात्रा’ कर्नाक बंदर ते मंत्रालयापर्यंत काढण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -