नशा आणि बिलाचे पैसे मागितले म्हणून दोघांवर प्राणघातक हल्ला

satana murder
प्रातिनिधिक छायाचित्र

नशा आणि बिलाचे पैसे मागितले म्हणून दोघांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर या आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील पहिली घटना घाटकोपर येथील हिमालय सोसायटी असल्फा, नंदीनी बिअर शॉपजवळ घडली. अमित राधेश्याम सोनी हा याच परिसरातील पहाडेश्वर मित्र मंडळात राहतो. शुक्रवारी नंदीनी बारमध्ये आरोपी आले होते. यावेळी ते बिलाची रक्कम न देता तेथून जाण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी अमितने त्यांच्याकडे बिलाचे पैसे मागितले. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला.

या वादातून या तिघांनी त्याला शिवीगाळ करुन हाताने बेदम मारहाण केली. त्यानंतर तलवारीसारख्या घातक शस्त्राने त्याच्या डोक्यात वार केले होते. त्यात अमित सोनी हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अमितच्या जबानीवरुन शनिवारी पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपींना नंतर पोलिसांनी अटक केली.

दुसरी घटना घाटकोपरच्या चांदतारा चौकी, सार्वजनिक बाथरुमजवळ घडली. सोनू आझाद शेख हा तरुण बंगालीपुरा गल्ली, संजयनगरचा रहिवाशी आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजता त्याच्या मित्राने त्याच्याकडे नशा करण्यासाठी पैसे मागितले होते. त्याने नशा करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने चाकूने त्याच्या मानेवर वार केले. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे.