उल्हासनगर मनपाच्या सहाय्यक आयुक्ताला अटक

बांधकाम ठेकेदाराकडून मागितली होती ५० हजारांची लाच

man arrested in demand ransom from a woman and offensive photo viral

एका बांधकाम ठेकेदाराकडून ५० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी उल्हासनगर मनपाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त अनिल खतुरानी (५०) यास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलिसांनी अटक केली आहे.

उल्हासनगर मनपाच्या प्रभाग समिती -२ च्या हद्दीत एका ठेकेदाराची बांधकामे सुरू आहेत या बांधकामांवर कारवाई होऊ नये म्हणून अनिल खतुरानी यांनी ठेकेदाराकडून ५० हजार रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी सदर ठेकेदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या संदर्भात पोलीस पथकाने २ डिसेंबरपासून स्थानिक मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या मदतीने तपास सुरू होता. सोमवारी दुपारी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात खतुरानी याला पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा त्याने ठेकेदाराकडून २५ हजार लाच घेतल्याची कबुली दिली व आणखी २५ हजार रुपये त्याने मागितल्याचेही मान्य केले असता त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून अशा बांधकामांच्या विरोधात तक्रारी करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही असा आरोप उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी करून या संदर्भात तारांकीत प्रश्नाद्वारे राज्य शासनाचे लक्ष वेधले होते. खतुरानी यांच्या लाच प्रकरणाने मनपा अधिकारी बांधकामांना संरक्षण देण्यासाठी ठेकेदारांकडून लाच मागितल्याने सिद्ध झाले आहे. सध्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण अधिकारी या पदावर असलेले गणेश शिंपी यांना देखील २०१३ मध्ये एका ठेकेदाराकडून लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.