मुंबई : गिरगाव येथे बंसी भवन या तळमजला अधिक तीन मजली इमारतीचा सज्जेचा काही भाग बुधवारी दुपारच्या सुमारास अचनाकपणे कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र दुर्घटनेमुळे इमारतीमध्ये अडकलेल्या काही रहिवाशांची घटनस्थळी तत्काळ दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूपपणे सुटका केली. त्यामुळे सदर रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.(At Girgaon part of the structure of the building collapsed Good riddance to the residents)
पालिका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, बुधवारी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास गिरगाव, खेतवाडी 3 री गल्ली, अलंकार सिनेमा येथील बंसी भवन या तळमजला अधिक तीन मजली इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील सज्जाचा काही भाग अचानकपणे कोसळला. त्यामुळे इमारतीमधील रहिवाशी इमारतीमध्येच अडकले होते. त्यांना इमारतीमधून बाहेर पडणे अवघड झाले होते. मात्र दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.
रहिवाशांची जिन्याच्या मार्गाने केली सुटका
दुर्घटनेमुळे इमारतीमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी जोखीम पत्करून इमारतीच्या जिन्याच्या मार्गाने सुखरूप सुटका केली. यावेळी, अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीचा आणखीन काही सज्जचा पडण्याच्या स्थितीत असलेला भाग बांबूच्या साहाय्याने पाडून टाकला.
हेही वाचा : GANPATI VISARJAN 2023 : दीड दिवसांच्या गणरायाला मनोभावे दिला निरोप
परिसर केला प्रतिबंधित
सुरक्षिततेचा उपाय म्हणून सदर भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. अग्निशमन दलाने रहिवाशांची सुटका केल्याने रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
हेही वाचा : गणेशोत्सवात ‘स्टिंग रे’, ‘जेलीफीश’पासून सावधानता बाळगा; महापालिकेचे गणेशभक्ताना आवाहन
15 सप्टेंबर रोजी कोसळली होती डोंबिवलीत इमारत
मुंबई, ठाणे तसेच आजूबाजूच्या शहरात जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न हा कायमच महत्त्वाची समस्या राहिलेला आहे. अनेकदा पालिकांकडून नोटीसा येऊन सुद्धा काही नागरिक हे धोकादायक इमारतींमधून दुसरीकडे स्थलांतरित करत नाहीत. अशीच एक घटना 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास डोंबिवलीत घडल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेतील आयरे-दत्तनगर परिसरातील आदिनारायण नावाची इमारत कोसळून दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आदिनारायण सोसायटीतील ही इमारत जुनी झाली होती. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेने या इमारतीमधील रहिवाशांना 14 सप्टेंबर रोजी दुसरीकडे स्थलांतरीत होण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर इमारत कोसळल्याची घटना घडली.