‘यहाँ कोरोनाका व्हायरस है’, सेव्हन हिल्स रूग्णालयात घाबरवण्याचा प्रयत्न!

सेव्हन हिल्स रुग्णालयात प्रारंभी परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना क्वारंटाईन म्हणून ठेवले जात होते. परंतु आता याच रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करून कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जाते

कस्तुरबा रुग्णालयानंतर कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या मरोळमधील सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये महापालिकेच्यावतीने खाटांची संख्या अधिकाधिक वाढवून आयसोलेशन वॉर्डाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सेव्हन हिल्समध्ये युध्दपातळीवर हे काम सुरु असतानाच येथील विविध कंत्राटदारांच्या कामगारांना येथील हाऊसकिपिंगची मुले घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. या हाऊसकिपिंगच्या मुलांनी कोरोनाची भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. अखेर याप्रकरणात सुरक्षा रक्षकांना हस्तक्षेप करत त्यांना बाजुला करण्याची वेळ आली.

सेव्हन हिल्स रुग्णालयात प्रारंभी परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना क्वारंटाईन म्हणून ठेवले जात होते. परंतु आता याच रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करून कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जाते. त्यामुळे येथील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात असून या भागात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. परंतु या इमारतीच्या चौथ्या, पाचव्या व सहा मजल्यावर अतिरिक्त खाटा वाढवून आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचे काम सुरु आहे. मात्र, याठिकाणी हाऊसकिपिंग, कॅटरर्स आदींच्या कामगारांसह कंत्राटदारांची कामगारही याठिकाणी राहत आहे. यासर्वांसाठी ९ व्या मजल्यावर व्यवस्था करण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा या ९ व्या मजल्यावरील हाऊस किपिंगच्या तीन कामगारांनी येथील विविध कामांसाठी नेमलेल्या कंत्राटदारांच्या कामगारांना ‘यहाँ कोरोनाका व्हायरस है’,असे सांगत घाबरवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही जोरजोरात ओरडण्याचा प्रयत्नही केला. त्यामुळे काही काळ येथील वातावरण अशांत झाले होते. अखेर ही बाब रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने दम भरला. मात्र, एका बाजुला महापालिकेच्या आरोग्य पायाभूत सुविधामार्फत सर्व अभियंते हे कंत्राटदारांच्या माध्यमातून  नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना अशाप्रकारच्या भीतीमुळे कंत्राटदारांच्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे काम वेळेत पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हे ही वाचा – ब्रिटनला मोठा दिलासा! देशाच्या पंतप्रधानांची कोरोनापासून सुटका!