पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा कर्मचार्‍यांवर लक्षप्रणाली

रेल्वे स्थानके, रेल्वेगाड्यांसह रेल्वेच्या परिसरातील प्रवासी, मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाची असते. त्यामुळे आरपीएफ जवान पेट्रोलिंगवर असतात. मात्र यातील काही पोलीस कामचुकारपणा करत असल्याच्या तक्रारी वारंवार रेल्वेकडे आल्या होत्या.त्यामुळे पहिल्यांदाच पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात क्यूआर कोड आधारित ई-पेट्रोलिंग आणि बीट मॅनेजमेंट प्रणाली सुरू केली आहे. यामुळे पश्चिम रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचार्‍यांवर सतत लक्ष असणार आहे.

कामचुकारांना बसणार चाप  

रेल्वेची मालमत्ता, रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, अधिकारी व कर्मचार्‍यांची कामे व ठिकाणे निश्चित केली जातात. पण संबंधित कर्मचारी निश्चित ठिकाणी आहे किंवा नाही, त्याची दैनंदिन कामे पूर्ण होत आहेत का, याबाबत लगेच माहिती मिळत नाही. त्यासाठी ‘आरपीएफ’कडून क्यूआर कोड आधारित ई-पेट्रोलिंग आणि बीट मॅनेजमेंट प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये जियो स्पेशल मॅपिंग आणि ग्राफिकल रिप्रेजेंटेशनसोबतच दैनिक /मासिक विश्लेषणात्मक अहवालसुध्दा देता येईल. तसेच ई-पेट्रोलिंग दरम्यान कस्टम डिजाइन मोबाईल अ‍ॅप विकसित केले जात आहे. हे अ‍ॅप आरपीएफच्या प्रत्येक कर्मचारी व अधिकार्‍याच्या मोबाईलमध्ये असेल. तसेच जिथे आरपीएफ जवानांची नियुक्ती केली आहे. तिथे क्यूआर कोड स्टीकर लावण्यात आले आहे. जेव्हा कर्मचारी ड्युटीवर तैनात होईल. तेव्हा मोबाईल अ‍ॅपच्यामाध्यमातून त्याला क्युआर कोड स्कॅनिग करावे लागणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रेल्वे जवान जातील, ते ठिकाण नियंत्रण कक्षात समजणार आहे. या प्रणालीमुळे कर्मचार्‍यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात ही अत्याधुनिक प्रणाली प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. या प्रणालीच्या अभ्यास करुन नंतर टप्प्याटप्प्यात ही प्रणाली इतर रेल्वे विभागात कार्यान्वित करण्यात येणार आहे.

काम न केल्यास अलर्ट

प्रत्येक आरपीएफ कर्मचार्‍यांच्या मोबाईलमध्ये अ‍ॅप असेल. कामाच्या ठिकाणी कर्मचारी आल्यानंतर रेल्वे स्थानकांवर लावलेला क्यु आर कोड स्कॅनिंग करावे लागेल. त्यानंतर संबंधिताला कामाचे क्षेत्र व नेमून दिलेले काम तसेच इतर माहिती उपलब्ध होईल. त्यानुसार तेच काम करावे लागेल.  या क्षेत्राच्या बाहेर केल्यास त्याचा अलर्ट नियंत्रण कक्षाकडे जाईल. काही घटना घडल्यास किंवा प्रवाशांना काही मदत हवी असल्यास त्यांना अलर्ट देता येईल. त्यानंतर तातडीने मदत पोचविणे शक्य होईल.