देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे भेटीवर बाळा नांदगावकरांचे सूचक संकेत, म्हणाले…

बाळा नांदगावकर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळपास दोन तास चर्चा झाली. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, संदीप देशपांडे उपस्थित होते. या भेटीनंतर मनसे-भाजपच्या युतीबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक संकेत दिले. ते म्हणाले भविष्यकाळात राजकारणात काहीही होऊ शकते.

ते वृत्त खोटे –

मध्यतरी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवले होते. ते पत्र सगळ्यांना आवडले होते. त्या पत्रानंतर फोनवरून दोन्हा नेत्यांचे बोलणे झाले होते. त्यानंतर आज फडणवीसांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थवर सदिच्छा भेट घेतली. १५-२० मिनिटे आम्ही दोन्ही नेत्यांसोबत होतो. या दोन्ही नेत्यांमधील चर्चेबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कळू शकेल. मंत्रिमंडळातील समावेशाबाबत आम्ही माध्यमांकडूनच ऐकतो आहे. अमित ठाकरेंना मंत्रिमंडळात घेणार यावर राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. अशाप्रकारे वृत्त खोटे आहे, असे त्यांनी सांगितले.

भविष्यात काय होईल ते आत्ता सांगता येत नाही –

सध्या निवडणुका नाहीत त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकत नाही. सध्या राष्ट्रपती पदाची निवडुक आहे. या निवडणुकीबाबत आमचे एकमत आहे. आम्ही भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्या बदल्यात काय करायचे हे त्यांच्या पक्षाचे धोरण असेल. कुठल्याही मोबदल्यासाठी राज ठाकरे निर्णय घेत नाहीत, असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. यावेळी त्यांनी मनसेला सकारात्मक वातावरण आहे. लोकांमध्ये सगळ्याच पक्षांबद्दल अविश्वास निर्माण झाला आहे. सगळ्याच पक्षांबद्दल लोकांमध्ये अविश्वास निर्माण होत आहे. भविष्यात नक्की काय होईल ते आत्ताच सांगता येत नाही, असेही बाळा नांदगावकरांनी सांगितले

जनता सगळे बघत आहे –

राजकारणात काहीही अशक्य नाही. पुढे निवडणुकीत काय होईल हे सांगता येत नाही. महाविकास आघाडी बनेल असे वाटले नव्हते. त्यानंतर अशा प्रकारे आता सरकार बनेल असेही वाटले नाही. जनता सगळे बघत आहे. जनतेचा कौल डावलून  आधीचे सरकार बनले होते, असे बाळा नांदगावकर म्हणाले.