Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नवव्या स्मृतीदिनी शक्तीस्थळावर ठाकरे कुटूंबीयांची गैरहजेरी ?

balasaheb thackeray memorial park

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबरला नववा स्मृतीदिन असणार आहे. पण यंदाच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एक गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे बाळासाहेबांच्या कुटूंबीयांपैकी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी शिवतीर्थावर ठाकरे कुटूंबीयांपैकी कोणाचीही उपस्थिती असणार नाही. नऊ वर्षात पहिल्यांदाच ही गोष्ट घडणार आहे. ठाकरे कुटूंबीयांपैकी स्वतः उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येऊ शकणार नाहीत कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानेच्या दुखण्यामुळे हॉस्पिटलमध्ये अँडमिट आहेत. तर बाळासाहेबांचा नातू आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही गैरहजर राहणार असल्याचे समजते.  बाळासाहेबांची सून रश्मी ठाकरे याही याठिकाणी काही कारणामुळे हजर राहणार नसल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे ठाकरे कुटूंबीयांपैकी राज ठाकरे तरी याठिकाणी उपस्थित राहणार का हे बुधवारीच स्पष्ट होईल. ठाकरे कुटूंबीय जरी गैरहजर राहणार असले तरीही बाळासाहेबांना मानणारे शिवसैनिक कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी करणार हे नक्की आहे.

गैरहजेरीचे काय आहे कारण ?

बाळासाहेबांच्या निधनानंतर नऊ वर्षात पहिल्यांदाच अशी गोष्ट घडेल की, ठाकरे कुटूंबीयांपैकी कोणीही बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार नाही. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी दर्शनासाठी यंदा उद्धव ठाकरे यांच्यावर चार दिवसांपूर्वी मानेच्या दुखण्यामुळे छोटीशी शस्रक्रिया करण्यात आली आहे त्यामुळे अजूपर्यंत उद्धव ठाकरे यांना रिलायन्स हरकिनदास हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलेले नाही.   तर उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यादेखील हॉस्पिटलमध्ये उद्धव ठाकरेंसोबत बायो बबलमध्ये आहेत. त्यामुळे त्याही शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृर्तीस्थळावर अभिवादनासाठी येऊ शकणार नाहीत. उद्धव ठाकरे यांचा लहान मुलगा तेजस ठाकरेही वडिलांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी हॉस्पिटलच्या बायोबबलमध्ये असल्याने त्याचीही याठिकाणी गैरहजेरी असेल असे कळते.

तर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे पर्यावरण बदलांशी संबंधित COP26 परिषदेसाठी ग्लास्को युके येथे आहेत. ही परिषद ३१ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. या परिषदेला हजर राहण्यासाठी आदित्य ठाकरे हे ६ नोव्हेंबरपासून भारतात नाहीत. या परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्राशी आणि मुंबईशी संबंधित अनेक शिष्टमंडळांशी संबंधित विषयासाठी आदित्य ठाकरे हे एका आठवड्याहून अधिक काळापासून देशाबाहेर आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेच्या वेळीही आदित्य ठाकरे हजर राहिले नाहीत. तर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना सचिव  मिलिंद नार्वेकर हेदेखील हरकिसनदास हॉस्पिटलमध्येच बायोबबलमध्ये आहेत. त्यामुळे तेदेखील शिवतीर्थावर गैरहजर राहणार असल्याचे कळते.

उद्धव ठाकरेंनी नुकतीच सांगितली बाळासाहेबांची आठवण

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची एक आठवण बोलून दाखवली होती. प्रबोधनकारांवर खंड प्रकाशनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वचन पुर्ण करणार असल्याचे बोलले होते. एक शिवसैनिक मुख्यमंत्री होण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न आहे, हे स्वप्न लवकरच पुर्ण करणार असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले होते. उद्धव ठाकरेंच्या आरोग्याच्या कारणामुळे तात्पुरत्या मुख्यमंत्र्याच्या कार्यभाराच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शरद पवारांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण आले होते. पण त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून आलेल्या स्पष्टीकरणामुळे या संपुर्ण प्रकरणावर पडदा पडला होता.

स्मतृी स्थळाच्या ठिकाणी राज ठाकरे हजेरी लावणार ?

राज ठाकरेंचे प्रेरणास्थान असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी दर्शनासाठी ते हजर राहतीलच असे बोलले जात आहे. राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात राज ठाकरे हे खूपच कमी वेळा सार्वजनिक ठिकाणी दिसले आहेत. त्यामध्ये अपवाद म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अंत्यदर्शनासाठी राज ठाकरे दिसले. त्याआधी एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची त्यांनी कृष्णकुंजवर भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच आपले नवे निवासस्थान शिवतीर्थ येथे गृहप्रवेश केला आहे.