मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या 11 वा स्मृतीदिन आहे. शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी राज्याच्या कानोकोपऱ्यातून शिवसैनिक गर्दी करतात दिसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी, नेते शिवाजी पार्क येथे उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदे निघून गेल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी होताना दिसत आहे. (Balasaheb Thackeray Shinde Thackeray group face to face at Balasahebs memorial Loud sloganeering)
हेही वाचा – मराठा आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत पद भरती करू नये; संभाजी ब्रिगेडचे आवाहन
संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे आदी दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते. यानंतर एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरुन निघून गेल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते अनिल परब आणि अनिल देसाई यांच्या नेतृत्वात शिवाजी पार्कवर दाखल झाले. यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी होत असल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
अनिल देसाई काय म्हणाले?
शिवाजी पार्कवर उपस्थित असलेले ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतीदिन असल्यामुळे आमच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि देशासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं त्यांचा उद्या स्मृतीदिन आहे. त्यामुळे आम्ही शांततेने श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो आहोत. बाकीचे तमाशे करण्याच्या प्रयत्नात आहेत. कुणीही इथे विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर, आम्ही विघ्न येऊ देणार नाही, असे अनिल देसाई म्हणाले. कार्यकर्त्यांना शांत करताना अनिल देसाई म्हणाले की, त्यांचं झालं आहे, त्यांना आता निघून जाऊ द्या. आम्ही शांततेचं आवाहन केलं आहे. ज्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व माहिती आहे, ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार माहिती आहेत ते कुणीही इथे अनर्थ करणार नाहीत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कोण कुणाला डिवचत नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – शरद पवारांच्या जातीबाबतच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटलांची उपरोधिक टीका, म्हणाले…
नरेश म्हस्के काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर आरोप केले. त्यांनी हिंदुत्वाचे विचार सोडून दिले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ते अशा पद्धतीचे वागणूक करत आहेत. त्यांनी महिलांना धक्काबुक्की केली आहे. हे निषेधार्ह आहे, असं नरेश म्हस्के म्हणाले.