मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या ही चिंतेचा विषय बनला असल्याने पोलिसांकडून कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. पण आता मुंबईतील एका बांगलादेशी घुसखोराची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. कारण बांगलादेशातील हा घुसखोर लखपती आहे. सुरुवातीला पोलिसांनी या बांगलादेशी घुसखोरीची चौकशी केल्यानंतर तो मुळचा भारतीय असल्याची बतावणी त्याने केली होती. मात्र, या घुसखोराने बांगलादेशात राहणाऱ्या पत्नीसोबत जे काही व्हॉट्सअप चॅट केले होते, त्यातून त्याचे बिंग फुटले आहे. (Bangladeshi infiltrators who came to Mumbai became a millionaire)
मिळालेल्या माहितीनुसार, मोईन हयात बादशाह शेख (वय वर्ष 51) हा बांगलादेशी घुसखोर 17 वर्षांचा असताना अवैधपणे भारतात आला होता. त्याने त्यावेळी एजंटच्या मदतीने भारतीय जवानांची नजर चुकवून भारतात प्रवेश केला होता. आज त्याला मुंबईत राहून 34 वर्ष झाले आहेत आणि या काळात तो लखपती बनला आहे. ज्यावेळी तो 17 वर्षांचा असताना भारतात आला होता, तेव्हा त्याने एजंटला दोन हजार रुपये दिले होते. एजंटच्या मदतीने दोन हजारांत डोंगर पार करून तो सुरुवातीला मुंब्य्रात राहिला. तिथेच त्याने ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड बनवून घेतले. पण 1993 च्या दंगलीत त्याने पुन्हा बांगलादेश गाठले. यानंतर वातावरण शांत झाल्यानंतर तो पुन्हा तशाच पद्धतीने मुंबईत आला. यावेळी मात्र मोईन याने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईतील कागदपत्र बनवून घेतली.
हेही वाचा… Bangladeshi : भिवंडीतील गोदामात सापडले 7 बांगलादेशी; 5 ते 7 हजार रुपयांत बनतात भारतीय नागरिक
दुसऱ्यांदा मुंबईत आल्यानंतर त्याने कफ परेड येथील आंबेडकर नगरमध्ये राहू लागला. या ठिकाणी तो मुलांना उर्दू आणि कुराण शिकवत होता. कफ परेड येथे तो एका बड्या हॉटेलमध्ये मौलाना म्हणून परदेशातून येणाऱ्या मुस्लिमांसोबत नमाजमध्ये सहभागी व्हायचा. याच कागदपत्रांच्या आधारे लोकसभा निवडणुकीत त्याने मतदानही केल्याची माहिती उघडकीस आली. चौकशीत तो महिन्याला 70 हजार ते एक लाख रुपये दलालाच्या मदतीने कुटुंबीयांना पाठवत होता. या कामाच्या जोरावर त्याने त्याच्या मुलीचे लग्नही लावून दिले आणि मुलाला सौदी अरेबियाला सुद्धा पाठवले. धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही कामांसाठी तो एकंदरित चारवेळा बांगलादेशात जाऊन आला. धक्कादायक बाब म्हणजे घुसखोर असला तरी त्याने मुंबईत मतदान सुद्धा केले आहे.
मोईन कसा करायचा प्रवास?
17 वर्षांचा असताना भारतात घुसखोरी करताना मोईनला केवळ दोन हजार रुपये लागले होते. पण 2021 मध्ये तो जेव्हा पुन्हा भारतात आला, तेव्हा त्याने 15 हजार रुपये एजंटला दिले. मोईन मुंबईतून विमानाने कोलकात्याला जात असे. त्यानंतर तिथून ट्रेनने मुर्शिदाबाद आणि त्यानंतर पुढे खासगी वाहनाने सीमेजवळ पोहोचून तिथून पुढे एजंटच्या मदतीने सीमेवरील जवानांची नजर चुकवून डोंगर पार करून तो बांगलादेशात जातो, अशी माहिती समोर आली आहे.
असे फुटले बिंग…
कफ परेड पोलीस ठाण्यातील एटीसी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार प्रशांत सावंत, धर्मपाल भामरे यांच्या पथकाने मोईनला अटक केल्यानंतर सुरुवातीला त्याने मी भारतीयच असल्याची बतावणी केली. पण भोसले यांनी त्याचा मोबाइल तपासताच पत्नीने काही कामानिमित्त त्याला बांगलादेशचे नॅशनल आयडी कार्ड आणि जन्म दाखल्याची प्रत शेअर केल्याचे आढळले. ही कागदपत्रे एटीसी पथकाच्या हाती लागताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.