Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई बॅनर-पोस्टर वाद : भाजप पदाधिकाऱ्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कोयत्याने जीवघेणा हल्ला

बॅनर-पोस्टर वाद : भाजप पदाधिकाऱ्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कोयत्याने जीवघेणा हल्ला

Subscribe

मुंबई : मुंबईतील दहिसर विधानसभा मतदारसंघात बॅनरच्या वादातून शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. या हाणामारीत भाजपा पदाधिकारी विभीषण वारे गंभीर जखमी झाले असून त्यांना दहिसरमधील सुखसागर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वारे यांच्या पाठीवर, खांद्यावर, छातीवर आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना 29 टाके पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा पदाधिकारी विभीषण वारे हे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासोबत गेल्या 26 वर्षांपासून काम करत होते. मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला होता. शिंदे गट सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे सुडाच्या भावनेने हा हल्ल्या झाल्याची प्रतिक्रिया वारे यांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली असून, आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गुजरातमध्ये ७२ तास रंगला अटकेचा थरार, मुंबई गुन्हे शाखेने ‘असे’ पकडले अनिल जयसिंघानीला

शिवसेनेचे सुनील मांडवे, आशिष नायर, नितेश उतेकर, सोनू पालांडे, मयूर वाघेला, समीर कोटी, अनिल दबडे या कार्यकर्त्यांचा समावेश असून पुढील तपास सुरू आहे. तपासासाठी पाच पोलीस पथकांची नियुक्ती केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्व कार्यकर्त्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अनिल दबडे आणि सुनील मांडवे या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान विभीषण वारे यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत राजकीय सूडापोटीच वारे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे म्हटले आहे. दहिसरमधील या घटनेमुळे पुढील काही दिवसात भाजपा आणि शिंदे गटात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

- Advertisment -