घरमुंबईबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प लवकरच होणार पूर्ण - जितेंद्र आव्हाड

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प लवकरच होणार पूर्ण – जितेंद्र आव्हाड

Subscribe

बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी म्हाडाची लॉटरी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते गुरुवारी काढण्यात आली.

ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींतील पात्र २७२ भाडेकरू रहिवाशांना पुनर्वसन होऊ घातलेल्या इमारतींत त्यांच्या हक्काच्या घरांची निश्चिती करण्याचे काम शासनाने केले आहे. बीडीडी पुनर्वसन प्रकल्प निश्चितच लवकर पूर्ण होईल, असे आश्वासन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये दिले. बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी म्हाडाची लॉटरी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते गुरुवारी काढण्यात आली. या कार्यक्रमात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.

जमीन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील

आज सदनिका निश्चित झालेल्या भाडेकरूंबरोबर लवकरच करार केला जाणार असून या करारात त्यांना निश्चित झालेली सदनिका, इमारतीचा क्रमांक, सदनिकेचा मजला नमूद केला जाईल. मुंबईतील म्हाडाच्या जुन्या वसाहतींचा पुनर्विकास करून परवडणाऱ्या दरातील घरे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आव्हाड यांनी सांगितले. म्हाडाकडे येत्या पाच वर्षांत मुंबईबाहेर परवडणाऱ्या दरातील सदनिका उभारण्यासाठी सुमारे ५ हजार एकर जमीन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आव्हाड यांनी नमूद केले.

- Advertisement -

मुंबईची नगररचना सुटसुटीत होण्यास मदत

आजचा क्षण मुंबईसाठी महत्वाचा आहे, कारण मुंबईच्या जडणघडणीत बीडीडी चाळी एक महत्वाचा घटक ठरतात. दोन ते तीन पिढ्यांना आश्रय देणाऱ्या या चाळी लवकरच नवीन रूप धारण करतील आणि या प्रकल्पाच्या नियोजनातून मुंबई शहराची नगररचना देखील सुटसुटीत होण्यास मदत होईल. असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे या प्रसंगी म्हणाले.

६०७ भाडेकरू आतापर्यंत पात्र

ना. म. जोशी मार्ग येथे सुमारे पाच हेक्टर जागेवर एकूण ३२ चाळी असून त्यामध्ये एकूण २५६० कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांची पात्रता निश्चित करणे व तद्नुषंगिक बाबींसाठी सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन) कुलाबा विभाग, मुंबई शहर यांची शासनाने नियुक्ती केली आहे. आतापर्यंत १० चाळींतील ८०० भाडेकरूंचे पात्रतेबाबत सर्वेक्षण करण्यात आले असून ६०७ भाडेकरू आतापर्यंत पात्र ठरले आहेत. संक्रमण गाळ्यात स्थलांतरित होण्यासाठी आतापर्यंत म्हाडाने पात्र भाडेकरूंपैकी ३१४ भाडेकरूंशी जागेवरच करारनामा पंजीकृत करून घेतला असून यापैकी २७२ भाडेकरू संक्रमण गाळ्यात स्थलांतरित झाले आहेत.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -