घरमुंबईतळीरामांचे टेंशन दूर! लॉकडाऊनमध्ये मिळणार ऑनलाईन ऑर्डर 

तळीरामांचे टेंशन दूर! लॉकडाऊनमध्ये मिळणार ऑनलाईन ऑर्डर 

Subscribe

मुंबई महापालिकेने लॉकडाऊनमध्येही मागील वर्षीप्रमाणे यावेळीही वाईनशॉप धारकांना 'ऑनलाईन मद्य विक्री' करण्यास परवानगी दिली आहे.

राज्य सरकारच्या आदेशाने मुंबईत मिनी लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्याला लॉकडाऊनमध्येही सर्वात जास्त उत्पन्न मिळण्यास मदतगार ठरणाऱ्या तळीरामांची मोठी गैरसोय झाली आहे. मात्र, राज्य सरकार व मुंबई महापालिकेने सामान्यांच्या अडचणी सोडवण्याला प्राधान्य न देता तळीरामांची विशेष काळजी घेतली आहे. या तळीरामांना अडचण येऊ नये आणि सरकारी तिजोरीत मोठी भर घालणाऱ्या मद्य विक्रीवर त्याचा मोठा परिणाम होऊ नये म्हणून वेगळी नियमावली जारी केली आहे.

मुंबई महापालिकेने लॉकडाऊनमध्येही मागील वर्षीप्रमाणे यावेळीही वाईनशॉप धारकांना ‘ऑनलाईन मद्य विक्री’ करण्यास परवानगी दिली आहे. संपूर्ण आठवडाभर ही घरपोच सुविधा देण्यात येणार आहे. तसेच, बारमधूनही मद्य घरपोच मिळणार आहे. वाईनशॉपधारकांना त्यांच्या दुकानावर कोणत्याही ग्राहकाला ऑनलाईन ऑर्डरशिवाय मद्याची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता कडक लॉकडाऊन असो अथवा कितीही कडक निर्बंध, तळीरामांची दररोजची ‘तहान’ भागणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

दुसरीकडे लॉकडाऊनमुळे सरकारी तिजोरीवर होणारा परिणाम लक्षात घेता या ऑनलाइन वाईन विक्रीमधून सरकारला सर्वात जास्त उत्पन्न मिळणे सुरू राहणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्‍बाल चहल यांनी याबाबतचे एक परीपत्रक जारी करुन ऑनलाईन वाईन विक्री व घरपोच मद्य पुरवठा करण्यास विशेष परवानगी दिली आहे. वाईनशॉप बंद ठेवल्याने तळीरामांची मोठी गैरसोय झाली होती. काही ठिकाणी व्यापारी बांधवांनी आंदोलन करून लॉकडाऊनला रस्त्यावर उतरून विरोध दर्शविला. मात्र, गुपचूप वाईन पिऊन स्वतःला व्हाइट कॉलर समजणारे व्यापाऱ्यांसारखे रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाहीत. त्यांची ही अडचण सरकारने ओळखली आणि सरकारने स्वतःहून वाईनशॉप धारकांना ऑनलाईन मद्य विक्रीसाठी परवानगी दिली.

एका परवानगीमुळे आता तळीरामांची घरपोच सोय झाली. सरकारच्या तिजोरीत उत्पन्न जमा होणार असून वाईन शॉपधारकांची दुकानदारी सुरू राहून त्यांनाही स्वतःचे पोट भरता येणार आहे. आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत ही मद्य घरपोच देता येणार आहे. तसेच मद्य घरी पोहचवणाऱ्या व्यक्तीने वैयक्तिक स्वच्छता आणि कोविड संबंधीचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -