कर्नाक पुलाचे २७ तास तोडकाम; प्रवाशांसाठी बेस्टची पर्यायी व्यवस्था

सीएसएमटी व मस्जिद बंदर रेल्वे स्थानक दरम्यान पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन जुन्या आणि धोकादायक ठरलेल्या कर्नाक पुलाचे मोठे तोडकाम शनिवारी रात्रीपासून रविवार रात्रीपर्यत सलग २७ तास चालणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने २७ तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे.

best

मुंबई : सीएसएमटी व मस्जिद बंदर रेल्वे स्थानक दरम्यान पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन जुन्या आणि धोकादायक ठरलेल्या कर्नाक पुलाचे मोठे तोडकाम शनिवारी रात्रीपासून रविवार रात्रीपर्यत सलग २७ तास चालणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने २७ तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे. परिणामी सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळ प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रम शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी सकाळी ६.३० वाजेपर्यत १२ जादा बस चालविणार आहे. (BEST alternative arrangements for passengers due to 27 hours demolition of Carnac Bridge)

मध्य रेल्वे, मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासन यांच्या समन्वयातून बेस्ट उपक्रम भायखळा व वडाळा ते सीएसएमटी दरम्यान जादा बसगाड्यांची व्यवस्था करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. बेस्ट उपक्रम शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी सकाळी ६.३० वाजेपर्यत १२ जादा बस चालविणार आहे. त्याचप्रमाणे आणखी सात प्रमुख मार्गांवर रविवारी ३५ बस सोडण्यात येणार आहेत.

कर्नाक पुलाच्या तोडकामासाठी आवश्यक ती संपूर्ण यंत्रणा, जेसीबी, ४ अजस्त्र क्रेन, मनुष्यबळ आदी तयार ठेवण्याचे काम रेल्वे प्रशासन करीत आहे. त्यापैकी एक क्रेन गुरुवारी तर दोन क्रेन शुक्रवारी दाखल झाल्या आहेत. तसेच, या ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी रेल्वे टर्मिनल्स येथून बाहेरगावी जाणाऱ्या व बाहेरून सीएसएमटी रेल्वे स्थानकात दाखल होणाऱ्या मेल, एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या दादर, पनवेल रेल्वे स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रवाशांचे मात्र मेघा हाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कर्नाक पुलाच्या तोडकामासाठी रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी ते मस्जिद बंदर दरम्यानचा शनिवारी रात्रीपासून ते रविवारीपर्यत २७ तासांचा ब्लॉक घेतला आहे. वास्तविक, या पुलाचे काही प्रमाणात बांधकाम हे गेल्या काही दिवसांपासूनच तोडणे सुरू होते. या पुलाच्या दोन्ही बाजूचे काही बांधकाम पाडण्यात आले आहे. मात्र पुलाचा उर्वरित व मुख्य भाग हा पुलाखालून गेलेल्या रेल्वे मार्गावर असल्याने रेल्वे वाहतूक बंद केल्याशिवाय या पुलाचे तोडकाम करणे कठीण होते. गुरुवारी एक अजस्त्र क्रेन या पुलाच्या पूर्व भागाच्या टोकाला उभी करण्यात आली होती. तर शुक्रवारी आणखीन दोन अजस्त्र क्रेन या पुलाच्या ठिकाणी दाखल झाल्या. शुक्रवारी या तिन्ही क्रेनचा वापर पुलाच्या आजूबाजूच्या तोडकामासाठी सुरू होता.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने, या पुलाच्या तोडकामासाठी घेतलेल्या २७ तासांच्या ब्लॉक दरम्यान लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत काही बदल केले आहेत. या ब्लॉकच्या कालावधीत लोकल ट्रेन फक्त मध्य रेल्वेवर भायखळा आणि हार्बर मार्गावर वडाळ्यापर्यत धावणार आहेत. सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची लोकल वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात येणार असल्याने या मार्गावर एकही लोकल धावणार नाही.

रेल्वे प्रशासनाने अनेक मेल-एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक रद्द केली आहे. तर काही मेल – एक्सप्रेस गाड्या या मध्य रेल्वेच्या दादर आणि पनवेल रेल्वे स्थानकापर्यतच चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे काही प्रमाणात हाल होणार आहेत.


हेही वाचा – मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाइमपास सुरू; आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा