अंधेरीत बेस्टच्या बसला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबईतील अंधेरी स्थानक परिसरात असलेल्या बेस्टच्या बसला भीषण आग लागली. अंधेरीतील आगरकर चौक येथे बुधवारी संध्याकाळी ६.५५ वाजताच्या सुमारास बसला आग लागली.

मुंबईतील अंधेरी स्थानक परिसरात असलेल्या बेस्टच्या बसला भीषण आग लागली. अंधेरीतील आगरकर चौक येथे बुधवारी संध्याकाळी ६.५५ वाजताच्या सुमारास बसला आग लागली. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (BEST Bus Fire At Agarkar Chowk In Andheri)

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील आगरकर चौक येथे बेस्टच्या बस क्रमांक 415 बसला आग लागली. बसला आग लागल्यानंतर अंधेरी स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. या आगची माहिती मिळताच घटनास्थळी अंधेरी पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. बसला लागलेल्या या आगीवर ७.१४ वाजता नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

बसला आग लागली असल्याचे समजताच बसमधून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी तातडीने धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर केले. जवळपास 7.15 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.

या आगीत बेस्टची बस संपूर्णपणे जळून खाक झाली. बसला लागलेल्या आगीमुळे अंधेरी स्थानकाकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि लोकांची गर्दी झाली होती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये बेस्टच्या बसमध्ये आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. बसला आग लागण्याच्या घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


हेही वाचा – राष्ट्रपती राजवट कोणाच्या सांगण्यावरून लागली हेसुद्धा पवारांनी सांगावं, फडणवीसांचा घणाघात