कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना बेस्टची ५० लाखांची मदत

best given to 50 lakhs to family of deceased employee
कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना बेस्टची ५० लाखांची मदत

कोरोना कालावधीत बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांसाठी अविरत बससेवा दिली. मात्र या कालावधीत बेस्टच्या ३३ हजार कर्मचाऱ्यांपैकी ३ हजार ५६१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यापैकी ९७ बस चालक, वाहक, कर्मचारी यांचा मृत्यू झाला आहे. या सर्व मृतांच्या कुटुंबियांना बेस्टतर्फे प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर ७८ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना बेस्ट उपक्रमात नोकरी देण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यानंतर कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आली. गेल्या दीड वर्षांपासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना करून या कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट परतवून लावली. आता तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर झाली आहे. मात्र या संपूर्ण कोरोनाच्या कालावधीत बेस्ट परिवहन विभाग आणि वीज विभागाच्या कर्मचारी, अधिकारी यांनी आपला जीव धोक्यात घालून मुंबईकरांना चांगली सेवा उपलब्ध करून दिली.

बेस्टच्या वीज आणि परिवहन खात्यातील ३३ हजार अधिकारी, कर्मचारी हे कार्यरत होते. त्यापैकी ३ हजार ५६१ अधिकारी, कर्मचारी, वाहक, चालक यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र यशस्वी उपचारानंतर ३ हजार ४३५ अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना नियमांचे पालन करून यशस्वीपणे मात केली. तर ९७ कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी दोन हात करताना दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिकेकडून ५० कोटी रुपये घेऊन खरे कोरोना योद्धा ठरलेल्या ९७ अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत केली. तर ‘बेस्ट’ने ७८ मृत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नोकऱ्या दिल्या.