घरमुंबईबेस्टचा ७२० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर

बेस्टचा ७२० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर

Subscribe

बेस्ट उपक्रमाचा आज सन २०१९-२० चा अर्थसंकल्प सादर केला आहे. तोट्यात चाललेल्या बेस्टने तब्बल ७२० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा भाडेवाढीला सामोरे जावे लागेल की काय? असे चित्र निर्माण झाले आहे. सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार बेस्टला ५३५५.१४ कोटींचा महसूल प्राप्त होणार असून ६०७५.६८ कोटींचा अंदाजित खर्च दाखवण्यात आला आहे. तसेच ३१ मार्च २०२० पर्यंत बेस्टच्या ताफ्यात ४०५० बस वाढवण्याचे अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे. बेस्टचा हा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांच्यातर्फे बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांना सादर केला आहे.

बेस्ट प्रशसनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात विद्युत विभागाकडून ३६९३.३६ कोटी उत्पन्न मिळणार असून ३५६९.१९ कोटी खर्च होईल. विद्युत विभागाकडे १२४.१७ कोटी रुपये शिल्लक राहतील. परिवहन उपक्रमाकडून १६६१.७८ कोटी रुपये उत्पन्न मिळणार असून २५०६.४९ कोटी रुपये खर्च होणार आहे. परिवहन उपक्रमाला उत्पन्नापेक्षा ८४४.७१ कोटी रुपये अधिक खर्च करावे लागणार आहेत. बेस्टच्या विद्युक्त आणि परिवहन विभागाकडून एकत्रित ५३५५.१४ कोटी रुपये उत्पन्न मिळणार असून ६०७५.६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. यामुळे बेस्टला ७२०.५४ कोटी रुपयांची तूट अपेक्षित धरण्यात आली आहे.

- Advertisement -

तुटीच्या अर्थसंकल्पाची हॅट्रिक

बेस्टने सन २०१७ – १८ चा ५८० कोटी, सन २०१८-१९ चा ८८० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. आता पुन्हा बेस्टने सन २०१९ – २० चा ७२०.५४ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात बेस्टने हॅट्रिक केली आहे. एकीकडे बेस्ट आर्थिक संकटात असताना बेस्टच्या प्रवाशांची संख्या ४३ लाखावरून २९ लाखावर आली आहे. बेस्टपासून दुरावलेल्या प्रवाशांना पुन्हा बेस्टकडे आकर्षित करण्यासाठी स्वयंचलित भाडेवसुली पद्धत अवलंबली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -