मुंबईतील सर्वच प्रसिद्ध गणपतींचं आगमन झालं असल्याने आता सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश प्रतिष्ठापनेची आतुरता भाविकांना लागली आहे. मुंबईत दरवर्षी गणेशोत्सवाचा एक वेगळा उत्साह, वातावरण पाहायला मिळते. यंदाही संपूर्ण मुंबई गणेशमय झाली आहे. (Best service for Mumbaikars Bus tours will continue throughout the night for Ganesha devotees)
मुंबईत आठवडाभरापूर्वीच वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात गणरायाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली. भव्य आणि उंच गणेशमूर्ती, आकर्षक देखावे आणि रोषणाई हे मुंबईतील गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असतं. त्यामुळे मुंबईसह जगभरातील भाविकांची दर्शनासाठी अधिक गर्दी पाहायला मिळते. लालबागचा राजा, गणेश गल्ली राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकाया मेन्शनमधील गणपती, परळचा राजा या गणपतींचं आगमन झाल्यानं या भागात वातावरणात नवचैतन्य असतं. त्यामुळे प्रत्येक भाविक हा गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल होत असतो.
भाविक रात्रभर गणपती पाहतात. भाविकांना विविध गणपतींचं दर्शन घेता यावं, यासाठी आता बेस्टने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बेस्टने रात्रभर बससेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत 20 पेक्षा अधिक बसगाड्या चालवण्यात येणार असून गणेशोत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांत ही सुविधा देण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण विभागाच्या सभागृहात मुंबई पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, यांसारख्या विविध प्राधिकरणांनी बैठक घेतली होती. या बैठकीत, गणेशोत्सवकाळात मुंबईत फिरणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून बेस्ट आणि रेल्वेने रात्रभर सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना त्यांनी केली होती. या सूचनेनुसार बेस्ट उपक्रमाने नियोजन केलं आहे. गणेशोत्सवकाळात पहिल्या पाच दिवसांत घरगुती गणपती येतो. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने शेवटच्या पाच दिवसांत मुंबईत रात्रभर बससेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित बसगाड्यांव्यतिरिक्त 20 ते 28 जादा बसगाड्या या रात्रभर सेवा देणार असल्याची माहिती आहे. पाच ते सहा विविध मार्गांवर या बस चालवण्यात येणार आहेत. या बसगाड्यांची सेवा 24 तास असेल.
(हेही वाचा: करीरोड, लोअर परळसह दक्षिण मुंबईच्या दिशेने वाहतूक होणार सुलभ; डिलाईल रोडची एक मार्गिका खुली )