घरताज्या घडामोडीBhandup Dreams Mall Fire: आगीतून बचावलेले २२ कोरोनाबाधित बेपत्ता!

Bhandup Dreams Mall Fire: आगीतून बचावलेले २२ कोरोनाबाधित बेपत्ता!

Subscribe

भांडुप (प) येथील ड्रीम्स मॉलमध्ये गुरुवारी रात्री उशिराने भीषण आग लागल्याची घटना घडली. याच मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सनराइज रुग्णालयाला या आगीची मोठी झळ बसली. आगीच्या धुरामुळे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अद्यापही आग पूर्णतः विझलेली नाही. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. मात्र एक धक्कादायक आणि गंभीर बाब उघडकीस आली आहे की, आगीतून बचावलेल्यांपैकी २२ कोरोनाग्रस्त रुग्ण बेपत्ता झाले असून त्यांचा पालिका आणि पोलिसांकडून शोध सुरू आहे. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, पूर्व उपनगरातील भांडुप (प.) मजली ड्रीम्स मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावर सनराइज रुग्णालय आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत होते.

मृतांची ओळख पटली

पालिकेने आता दिलेल्या माहितीनुसार, एकूण ११ जण मृत आहेत. त्यापैकी २ जण कोरोनामुळे अगोदर मृत पावले होते. त्यामुळे आगीच्या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाल्याचे पालिकेने म्हटले आहे. या मृतांमध्ये निसार जावेदचंद (वय ७४), मुणगेकर (वय ६६), गोविंदलाल दास (वय ८०), मंजुला बथारिया (वय ६५), अंबाजी नारायण पाटील (वय ६५), सुनंदाबाई अंबाजी पाटील (वय ५८/ महिला), सुधीर सखाराम लाड (वय ६६), हरीश करमचंद सचदेव (वय ६८), श्याम भक्तीलाल (वय ७७) आणि आणखीन एक अनोळखी यांचा समावेश आहे. सुदैवाने या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्त ६८ रुग्णांना वेळीच रुग्णालयाबाहेर काढून अन्यत्र हलविण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.

- Advertisement -

७८ रुग्णांवर उपचार होते सुरू

रात्री ११.३० वाजताच्या सुमारास या मॉलमध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या गाळ्यात आग लागल्याची घटना घडली. ही आग हळूहळू भडकली. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. या आगीत धुराचे लोट रुग्णालयात पसरले. या रुग्णालयात ७८ रुग्णांवर उपचार सुरू होते. तर ३ जणांना कोरोनाची लागण नव्हती. तसेच, काही रुग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते.

रुग्णांची तात्काळ सुटका केल्याने पुढील अनर्थ टळला

आगीची घटना कळताच रुग्णालयात एकच धावपळ झाली. रुग्ण चांगलेच भयभीत झाले. काही रुग्णांनी इमारतीच्या गच्चीवर तर काही रुग्णांनी रुग्णालयाबाहेर धाव घेतली. दरम्यान, ही आग हळूहळू आणखीन भडकली आणि रात्री १ वाजताच्या सुमारास आग आणखीन भडकली आणि स्तर-३ची भीषण आग झाली होती. तर रात्री १.४५ नंतर ही आग आणखीनच भडकली आणि स्तर -४ ची भीषण आग झाली. या आगीची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. रुग्णालय कर्मचारी, स्थानिक नागरिक, अग्निशमन दलाने इमारतीत, रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांची तात्काळ सुटका केल्याने पुढील अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी १४ फायर इंजिन, ११ जंबो वॉटर टँकर आदींच्या साहाय्याने या आगीवर पहाटेच्या सुमारास नियंत्रण मिळविले होते. मात्र नंतर पुन्हा आग भडकली. त्यामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत या आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवता आले नव्हते. ही आग पूर्णपणे विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -

दरम्यान, ही आग का आणि कशी लागली याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी शोध घेत आहेत.
या आगीतून बचावलेल्या रुग्णांपैकी, ३० कोरोनाग्रस्त रुग्णांना मुलुंड येथील जंबो कोविड सेंटरमध्ये, ४ रुग्णांना फोर्टीजमध्ये -४, ठाणे येथील विराज रुग्णालयात -२, बीकेसी रुग्णालयात १, गोदरेज रुग्णालयात – १,सारथी रुग्णालयात -१, अग्रवाल रुग्णालयात -५ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


हेही वाचा – भांडूप ड्रिम्स मॉल आग प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार – मुख्यमंत्री


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -