Bhandup Dreams Mall Fire : भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी ही मागणी केली. 

Bhandup's Dreams Mall
ड्रीम्स मॉलमधील ‘सनराईज’ रुग्णालय

भांडुप येथील ड्रीम्स मॉलमधील सनराईज हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत ११ जणांच्या मृत्यूला एस विभागातील संबंधित भ्रष्ट अधिकारी कारणीभूत आहेत. या रुग्णालयाला परवानगी नसताना राजकीय दबावापोटी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. सदर रुग्णालयाला मॉलमध्ये परवानगी दिली जात नाही. मात्र, तत्कालीन उपायुक्तांनी त्यावेळचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्यावर दबाव आणून परवानगी देण्याचा प्रयत्न केला. परंतु, धोंडे यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली. पुढे तत्कालीन कार्यकारी अभियंत्यावर सहाय्यक आयुक्तपदाचा भार होता. त्यांच्या कारकिर्दीत या रुग्णालयाला विक्रोळी व भांडुप येथील आमदारांच्या राजकीय दबावाखाली परवानगी देण्यात आली, असा आरोप भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केला.

मुळात ड्रीम्स मॉल धीरज वाधवान यांच्या मालकीचे आहे. त्यामध्ये असलेले सनराईज रुग्णालयही वाधवान यांच्या मालकीचे आहे. सत्ताधारी शिवसेना आणि वाधवान यांचे संबंध लक्षात घेता या रुग्णलयाला बेकायदा परवानगी देण्यात आली, असा आरोपही शिरसाट यांनी केला. वास्तविक, या रुग्णालयाला परवानगी नव्हती. चेंज ऑफ युजर करूनही परवानगी देण्यात आली नव्हती. केवळ राजकीय दबावापोटी ही परवानगी देण्यात आली. अग्निशमनदल ड्रीम्स मॉलपर्यंत पोहोचले. मात्र, रुग्णालयापर्यंत पोहोचण्याएवढी जागा नसल्याने ते तिथे पोहोचू शकले नाही. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांनाही वाचवता आले नाही. त्यांचा मृत्यू झाला.

त्याचप्रमाणे ड्रीम्स मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नव्हती. ज्या २९ मॉलना अग्निशमन दलाने नोटीस बजावल्या  होत्या, त्यात ड्रीम्स मॉलचाही समावेश होता. तरीही या मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावर रुग्णालय थाटण्यात आले आहे. मुळात मॉलमध्ये रुग्णालयाला परवागनी मिळत नाही. शिवाय ड्रीम्स मॉलमध्ये तर अग्निशमन यंत्रणाच नव्हती. त्यामुळे तिथे रुग्णालयाला परवानगी मिळण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र, कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून या रुग्णालयाला परवानगी मिळविण्यात आली. त्यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकण्यात आला.

ज्यावेळी येथे रुग्णालय उभारण्याचा विषय आला, तेव्हा तेथे संतोषकुमार धोंडे सहाय्यक आयुक्त होते. परिमंडळ-६ च्या विभागीय उपायुक्तांनी त्यांच्यावर दबाव आणला. मात्र, त्यांनी त्याला परवानगी दिली नाही. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यावेळी कार्यकारी अभियंत्यावर सहाय्यक आयुक्तपदाचा भार होता. त्यांच्या कारकिर्दीत या रुग्णालयाला परवानगी देण्यात आली. त्यानंतर त्यांची बदली क्रीम पोस्टवर करण्यात आली, असा आरोप भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केला.