Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई भांडुप हॉस्पिटल आग प्रकरणी राकेश वाधवानांसह नातेवाईकांविरोधात गुन्हा

भांडुप हॉस्पिटल आग प्रकरणी राकेश वाधवानांसह नातेवाईकांविरोधात गुन्हा

Related Story

- Advertisement -

भांडुप येथील ड्रीम मॉल येथे लागलेल्या आगीत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला असून, या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रीम मॉल मॅनेजमेंटमधील एचडीआयएलचे चेअरमन राकेश वाधवान यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांविरोधात भांडुप पोलीस कलम ३०४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये निकिता त्रेहान (राकेश वाधवान यांची मुलगी),सारंग वाधवान (राकेश वाधवान यांचे भाऊ), दीपक शिर्के आणि अन्य आरोपींचा समावेश असल्याचे समजते. तर सनराईज ग्रुप मॅनेजमेंटमधील प्रिविलेज हेल्थकेअरच्या अमित त्रेहान (राकेश वाधवान यांचा जावई) आणि स्विटी जैन यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

हा ड्रीम मॉल एचआयडीएलने २००९ मध्ये बनवला आहे. एचआयडीएलचे चेअरमन राकेश वाधवान यांची मुलगी निकिता त्रेहान सनराईज ग्रुपची एमडी आहे. ज्यांचं हॉस्पिटल ड्रीम मॉलमध्ये होते. कोविड काळात अटीशर्तींसह त्यांना कोविड हॉस्पिटल बनवण्याची परवानगी ३१ मार्च २०२१ पर्यंत मिळाली होती.

- Advertisement -

या प्रकरणातील राकेश वाधवान, सारंग वाधवान हे एचडीआयएल केसमध्ये तसेच पीएमसी बँक घोटाळ्यात आरोपी आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊन काळात वाधवान यांचा परिवार महाबळेश्वरला गेला होता. या प्रकरणात गृह विभागाच्या तत्कालीन सचिवांनी दिलेल्या पत्रावरून चांगलाच गोंधळ उडाला होता.

ड्रिम मॉलमध्ये गुरुवारी रात्री उशिराने भीषण आग लागल्याची घटना घडली. याच मॉलमध्ये असलेल्या तिसर्‍या मजल्यावरील सनराईज रुग्णालयाला या आगीची मोठी झळ बसली. आगीच्या धुरामुळे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार घेणार्‍या ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी आता मुंबई महापालिकेने येत्या १५ दिवसांत चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. भांडुपच्या ड्रिम मॉलला ओसी नसल्याचे देखील समोर आले आहे. महत्वाची बाब म्हणजे भंडार्‍याची घटना झाल्यानंतर सर्व रुग्णालयांची फायर ऑडिट करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते. जी तात्पुरती रुग्णालये आहेत, त्यांचं ऑडिट करणं आवश्यक होतं. मात्र, तरी देखील ऑडिट करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. याबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

तसेच सदर घटनेप्रकरणी आरोपींवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर दुर्घटनेची प्राथमिक चौकशी करता ड्रिम मॉलचे संचालक, प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासक यांनी मॉलमध्ये आणि सनराईज रुग्णालयात सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे होते. रुग्णालयामध्ये सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करणे, सुरक्षेच्या परवान्यामध्ये दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी करणे. सुरक्षेच्या परवान्यामध्ये दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेणे, अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही, याची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी जाणीवपूर्वक सदर खबरदारी घेतली नसल्याने ही दुर्घटना समोर आली आहे.

१५ दिवसांत अहवाल सादर करा
भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) प्रभात रहांगदले यांना पुढील पंधरा दिवसात आगीबाबत व आगीच्या कारणांबाबत सर्वंकष चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -